हॉलिवूडमधील सेलिब्रिटी जोडपं जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाच्या खटल्याबद्दलची माहिती आफताबनं वाचून काढली. एखाद्याची वर्तणूक तपासावर कशाप्रकारे परिणाम करते याची माहितीही त्यानं वाचली आहे. श्रद्धाच्या हत्या प्रकरणात आपल्याला कधी ना कधी अटक होणार याची कल्पना आफताबला होती. त्यासाठीची तयारी आफताबनं आधीच केली होती.
पोलीस कोठडीत असणाऱ्या आफताबच्या थंड वागणुकीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आफताबच्या वर्तणुकीमागचं कारण त्याच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीमध्ये दडलेलं आहे. हत्येनंतर इंटरनेटवर वाचलेल्या अनेक गोष्टींमुळेच आफताब चौकशीदरम्यान अतिशय निश्चिंतपणे वागताना दिसत आहे. हत्या प्रकरणाच्या तपासापासून खटल्यापर्यंतच्या घडामोडींमध्ये आरोपीच्या वर्तनाचा नेमका काय काय परिणाम होतो, याबद्दल आफताबनं सखोल माहिती मिळवली आहे.
आफताबच्या मोबाईलमधील सर्चवर नजर टाकल्यास बऱ्याचशा गोष्टी वर्तणुकीबद्दलच्या आहेत. तणावपूर्ण काळात माणसांची वर्तणूक कशी असते. डेप आणि हर्डच्या घटस्फोटाच्या खटल्याचा आफताबनं अतिशय बारकाईनं अभ्यास केला. वर्तणुकीचा परिणाम तपासावर कसा होतो, याबद्दलची माहिती त्यानं वाचली होती, असं पोलीस दलातील सुत्रांनी सांगितलं. हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या आणि निर्दोष ठरलेल्या व्यक्तींची वर्तणूक कशी होती, याचा बराच अभ्यास आफताबनं केला आहे.