Authored by सचिन जिरे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Dec 2022, 3:21 pm

Shinde Guwahati visit | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी गुवाहाटी दौऱ्याची कारणेही वेगवेगळी सांगितली होती. एकनाथ शिंदे यांनी आम्ही आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून गुवाहाटीला जात असल्याचे सांगितले होते. तर शिंदे गटाच्या आमदारांनी सत्तांतर यशस्वी पार पडू दे, यासाठी आम्ही कामाख्या देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे म्हटले होते. मात्र, खरे कारण गुलदस्त्यातच होते.

 

Eknath Shinde camp Guwhati
शिंदे गट गुवाहाटी दौरा

हायलाइट्स:

  • शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यात नेमकं काय घडलं?
  • शिंदे गटाचे आमदार फुटण्याची शक्यता
मुंबई: काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला गेले होते. महाराष्ट्रात अनेक प्रश्न समस्या प्रलंबित असतानाही एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीला का घेऊन गेले, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज होते. या राजकीय अस्थिरतेची कुणकुण लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांची एकजूट कायम ठेवण्यासाठी गुवाहाटी दौरा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी गुवाहाटी दौऱ्याची कारणेही वेगवेगळी सांगितली होती. एकनाथ शिंदे यांनी आम्ही आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून गुवाहाटीला जात असल्याचे सांगितले होते. तर शिंदे गटाच्या आमदारांनी सत्तांतर यशस्वी पार पडू दे, यासाठी आम्ही कामाख्या देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे म्हटले होते. या सगळ्यामुळे शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याविषयी एक संभ्रम निर्माण झाला होता. (CM Eknath Shinde and MLA’s visit kamakhya devi temple in Guwahati)
‘मी बोकड स्वीकारणार नाही’ कामाख्या देवीनं स्वप्नात दृष्टांत दिल्याचा शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. त्यांना एकत्र बांधून ठेवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून या सगळ्यांना गुवाहाटीला नेण्यात आले होते. तसेच नाराज आमदार फुटू नयेत म्हणून प्रत्येक आमदाराला पुन्हा प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले. यावर आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
Shinde Camp: शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदारांची नाराजीमुळे दांडी? अब्दुल सत्तार स्पष्टच म्हणाले…
२८ आणि २९ नोव्हेंबरला शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बहुचर्चित गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराने दांडी मारली होती. यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. पण विशेष गोष्ट म्हणजे शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील रवींद्र चव्हाण आणि मोहित कंबोज हे दोन नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. याचीही राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here