या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पाहणीत मृताच्या गळ्यावर व्रण दिसून येत असल्यामुळे त्याचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज लावला जात आहे. घटनास्थळावरून अमोल भामरे याच्या मृतदेहाच्या बाजूला वायर आढळून आली, याच वायरने गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच काही अंतरावर दारूच्या बाटल्याही पडलेल्या असल्यामुळे पार्टी दरम्यान वाद होवून घातपात केल्याची गावात चर्चा आहे. दुपारी उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, यासंदर्भात अमोल भामरे यांच्या कुटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, अमोल भामरे हा ड्रायव्हर होता आणि तो आपले काम प्रामाणिकपणे करायचा. काल पार्टीला चाललो असे सांगून घरातून बाहेर पडला, मात्र रात्री घरीच परतला नाही. त्यामुळे त्यांनी गावात शोधाशोध सुरू केला. अमोल भामरे याचं कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. मात्र त्याचा घात कोणी व का केला याची आम्हाला कल्पना नाही, त्यामुळे पोलिसांनी योग्य तपास करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी यावेळी केली आहे.