पंढरपूर: मंगळवेढा सबजेलमधून आज पहाटे तीन कैदी पसार झाले. हे तिघेही कैदी करोनाबाधित होते. या तिघांना पोलिसांनी नाट्यमयरित्या पकडलं. मात्र, पीपीई कीटशिवाय कैद्यांना पकडणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता करोना चाचणी करावी लागणार आहे.

करोनानं राज्यात हाहाकार माजवला आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवेढा सबजेलमधील तब्बल २८ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर प्रशासनाने तातडीने यातील करोना कैद्यांना याच ठिकाणी म्हणजे मंगळवेढ्यात किल्ल्यामध्ये असलेल्या सबजेलमध्ये ठेवत उर्वरित कैद्यांना दुसरीकडे हलवले होते. याच संधीचा गैरफायदा घेत तीन खतरनाक कैद्यांनी आज पहाटे साडेतीन वाजता छताकडे असलेली लोखंडी जाळी वाकवून त्यातून पलायन केले. हे तीनही कैदी खून आणि खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. कैदी फरार झाल्याची माहिती मिळताच मंगळवेढा पोलीस निरीक्षक गुंजवटी आपल्या पथकाला घेऊन तातडीने सबजेलमध्ये पोहोचले. किल्ल्याच्या भिंती उंच असल्याने सुरुवातीला या किल्ल्यातच शोध घेण्यास सुरुवात केली. दोन कैदी याच भागात लपलेले आढळून आले. यातील एक कैदी खुनाचा आरोप असलेला आहे. तर दुसरा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत होता.

दोन्ही कैदी समोर दिसले. मात्र, करोनाबाधित असल्यानं त्यांना पकडायचे कसे असा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांसमोर होता. अखेर पीपीई कीटशिवाय त्यांना पकडले. तिसरा कैदी किल्ला ओलांडून पळून गेल्याचे समोर आले. या कैद्याने जाताना किल्ल्याच्या मागे राहत असलेल्या एका घरात घुसून ३ मोबाइल चोरून दुचाकीवरून मोहोळच्या दिशेला पलायन केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत त्याचे ठिकाण शोधले. तो टाकळी सिकंदर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला शोधले. यावेळी पोलिसांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला पाचारण केलं. थोड्या वेळाने रुग्णवाहिकेतून त्याला मंगळवेढा सबजेलमध्ये आणले. विशेष म्हणजे या जेलमधील २ कैद्यांना रात्री त्रास जाणवू लागल्याने तेथे उपलब्ध असलेले पीपीई कीट घालून त्यांना उपचारासाठी सोलापुरात हलविले होते. त्यामुळे हे तीनही कैदी पळून गेल्यावर त्यांना पकडताना पोलिसांकडे पीपीई कीट उपलब्ध नव्हती. त्यामुळं कैद्यांना पकडणारे ३ पोलीस अधिकारी आणि १० कर्मचाऱ्यांना करोना चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान, या तिन्ही कैद्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here