सुसाईड नोटमधील माहितीनं संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण आहे. बालकराम यांच्या खिशात चार पानांची सुसाईड नोट सापडली. त्यातील मजकूर पाहता तो कोणीतरी बालकराम यांच्याकडून लिहून घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ‘जर कोणी या कुटुंबाला दु:ख दिलं असेल तर मी त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. कारण माझा बदला पूर्ण झालाय. एखाद्याला शरण जाऊन लाभ मिळेल असा विचार कोणी करत असेल तर असा कोणी मांत्रिक, संतच नाही, जो मला रोखू शकेल. कारण बालकराम सगळं काही करूनही परिस्थितीसमोर हरले,’ असं सुसाईड नोटच्या पान क्रमांक चारवर लिहिलं आहे.
‘मी यांच्या घरापासून एक दिवस दूर कधी गेले असं कोणाला वाटत असेल तर ते चूक आहे. मी कधीच एकही क्षण यांच्या घरातून गेले नव्हते. आता बदला पूर्ण झालाय. आम्ही सगळे जात आहोत. आता हे लोक कुठेही राहोत, मला त्यांच्याशी देणंघेणं नाही. यांचं जे जुनं घर आहे, मी तिथे कायमची राहीन. कायदा कोणावर संशय घेवो अथवा न घेवो, कारण हा आत्म्याचा खेळ आहे. कोणताही पुरावा, कुठे काहीच मिळणार नाही. आता कोणी असं काही पाऊल उचलू नका, ज्यामुळे पुन्हा एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. बदला पूर्ण झाला,’ असं या चिठ्ठीत पुढे नमूद करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पिलीभीतमध्ये बालकराम नावाच्या व्यक्तीच्या ११ वर्षीय मुलाचा आणि १५ वर्षांच्या मुलीचा मृतदेह बिछान्यात सापडला. तर दुसऱ्या खोलीत बालकरामचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. तिसऱ्या खोलीत झोपलेल्या १४ वर्षांच्या मुलाला जाग आली. त्यानं हा प्रकार पाहिला आणि त्याची माहिती कुटुंबातील अन्य सदस्यांना दिली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. बालकराम यांनी आधी दोन मुलांची हत्या केली आणि मग स्वत:ला संपवल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे दिली.