बाबांचे अश्रू थांबेनात
बाप आणि लेकीचं नातं असं खास असतं. लेकीसाठी जसा बाप हा खंबीर आधार असतो. अगदी तसंच बापासाठी लेक हा अभिमान आणि मोठा आधार असते. अनेकदा काही गोष्टी बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते. एक फोटो किंवा व्हिडिओ सारं काही बोलून जातो. अक्षया आणि तिच्या बाबांच्या या छोट्याशा क्लिपने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे. व्हिडिओत अक्षयाला हळदी लावताना तिचे बाबा मुलीच्या पाठवणीच्या भावनेने भावुक झालेले दिसत आहेत. त्यांचे अश्रू थांबतच नाहीत आणि बाबांना रडताना पाहून अक्षयाही रडली.
बापाच्या अंगणात लेक कितीही मोकळेपणाने बागडली तरी तिला एक दिवस सासरी जावं लागतं. तो क्षण साऱ्यांनाच भावुक करणारा असतो. अक्षयाचे बाबाही यात वेगळे नाही. मुलगी सासरी जाणाऱ्या या विचारांनीच त्यांना भरून आलं आणि ते एखाद्या लहान मुलासारखे रडले. तर मोठी होऊन अक्षयाने वडिलांना शांत केलं. हा बोलका व्हिडिओ कोणत्याही कॅप्शनशिवाय खूप काही बोलून जातो.
दरम्यान, दोघांनाही एकाच मंडपात हळद लावली गेली. यावेळी फक्त अक्षया आणि हार्दिकच नाहीतर त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि मित्र- मैत्रिणी बेभान होऊन नाचले. स्वतः हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या हळदीच्या कार्यक्रमाची झलक दाखवली. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘राणादा-पाठकबाई’ जोडी खऱ्या आयुष्यात २ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
हार्दिकनेही त्याच्या हातावर काढली मेंदी
दरम्यान अक्षयाच्या मेंदी कार्यक्रमात सर्वांच्या लाडक्या राणादानेही हातावर मेंदी काढली. त्याने आणि त्याच्या मित्रमंडळींनी हातावर #अहा हा त्यांच्या लग्नाचा हॅशटॅग मेंदीने काढून घेतला. ही मेंदी फ्लाँट करताना हार्दिकने काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.