कर्नाटकने गुरूवारी जत तालुक्यातील अनेक गावात पाणी सोडले. तिकोंडी, भिवर्गी, उमदीसह अनेक गावात या पाण्याचे पूजन करून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राने म्हैशाळ योजनेचे काम तातडीने सुरू करावे अशी जोरदार मागणी केली. त्यानुसार मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० जानेवारीपूर्वी या योजनेची निविदा काढण्याचे आदेश दिले.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे शनिवारी बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांचा हा दौरा आता ६ डिसेंबरला होणार आहे. या दिवशी ते सीमाभागातील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत. याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागातील २१ नाक्यावर दोन हजार पोलीस तळ ठोकून आहेत. ६ डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. तरीही सीमानाक्यावर भारत-पाकिस्तान सीमेप्रमाणे प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सीमाभागातील मराठी बांधवातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.