सोबत असलेल्या कैद्यांचं खेळून झाल्यानंतर आफताब बुद्धीबळ सुरू करतो. तो एकटाच खेळतो. त्याला समोर कोणीच लागत नाही. तो दोन्ही बाजूनं व्यूहनीती रचतो. दोन्ही बाजूनं चांगल्या चाली रचतो, अशी माहिती सुत्रांनी दिली. ‘आफताबला बुद्धीबळ खेळायला आवडतं. तो दोन्ही बाजूच्या सोंगट्या चालवतो. दोन्हीकडून रणनीती आखतो आणि एकटाच खेळत बसतो. या खेळातला तो उत्तम खेळाडू आहे,’ असं सुत्रांनी सांगितलं.
आफताबच्या सेलमध्ये आणखी दोन कैदी आहेत. त्यांच्यावर चोरीचे आरोप आहेत. त्यांना आफताबवर बारीक नजर ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. आफताब त्यांच्याशी फारसा बोलत नाही. तो केवळ तासनतास बुद्धीबळ खेळत बसतो आणि एकटाच खेळत असतो. आफताब स्वत:विरुद्ध चाली रचतो आणि त्यानंतर त्या चाली स्वत: हाणून पाडतो. श्रद्धा प्रकरणातही आफताब हेच करत असल्याचा संशय पोलिसांना आधीपासूनच आहे.
आफताब अतिशय धूर्त आहे. त्याची प्रत्येक चाल एका सुनियोजित कटाचा भाग आहे. दिल्ली पोलिसांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा अनुभव आला आहे. ‘कधीकधी वाटतं तपास अधिकारी आम्ही नाहीत, तर आफताब आहे. आफताब सांगतो त्या ठिकाणांवर पोलीस जातात. तिथे शोधाशोध करतात,’ अशा प्रकारचे उद्गार एका पोलीस अधिकाऱ्यानं काढले होते. त्यामुळे पोलीस आफताबनं रचलेल्या जाळ्यात अलगद अडकत जात आहेत का असा प्रश्न पडला आहे.
आफताब अतिशय हुशार आहे. या तपासात तो कधीही नवा ट्विस्ट आणू शकतो, असं एका तपास अधिकाऱ्यानं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्यानं सर्वकाही केलं. त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना सहकार्य केलं. पॉलिग्राफ आणि नार्को टेस्टची तयारी दर्शवली. मात्र आता पोलिसांना त्याच्या चांगली वर्तणुकीवर शंका येऊ लागली आहे. आफताबनं सुरुवातीला मुंबई पोलिसांची दिशाभूल केली. पण तपास दिल्ली पोलिसांकडे आल्यावर त्यानं गुन्हा कबुल केला. हादेखील कटाचा भाग आहे का, असा संशय पोलिसांना आहे.