Agriculture News : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) सोयाबीन, करडई आणि तूर अशा तीन पिकांच्या वानांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिकडून ही मान्यता देण्यात आली आहे. या पिकांच्या वाणांना मान्यता मिळाल्यामुळं शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आशा या वाणांचा प्रसार होण्‍यास मदत होणार आहे. 

26 ऑक्टोबरला नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिची बैठक उपमहासंचालक (पिकशास्‍त्र) डॉ. टि. आर. शर्मा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या तीन पिकांच्‍या वाणास मान्‍यता देण्‍यात आली आहे. यामध्ये विद्यापीठ विकसित तुरीचा वाण बीडीएन-2013-2 (रेणुका) हा राष्‍ट्रीय पातळीवर मध्‍य भारताकरिता तर सोयाबीनचे एमएयुएस-725 आणि करडई पिकाचे पीबीएनएस-154 (परभणी सुवर्णा) या वाणास राज्‍याकरता लागवडीस मान्‍यता प्राप्‍त झाली आहे. सदर वाण मान्‍यतेबाबतचे पत्र नुकतेच देशाच्‍या कृषी आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाकडून विद्यापीठास मिळालं आहे. त्यामुळं आता या वाणांचे बियाणे हे बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आशा या वाणांचा प्रसार होण्‍यास मदत होणार असल्‍याची माहिती संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी दिली. वाण विकसित करण्‍यासाठी योगदान देणाऱ्या शास्‍त्रज्ञांचे कुलगुरू डॉ. इन्‍द्रमनी आणि संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी अभिनंदन केले.

मान्यता मिळालेल्यावाणांची वैशिष्ट्ये काय? 

तुरीचा बीडीएन-2013-2 (रेणुका) वाण : 

तुरीचा रेणुका हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या मध्‍य भारत प्रभागासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. हा वाण बीएसएमआर-736 मादी वाण वापरुन आयसीपी-11488 हा आफ्रीकन दाते वाण संकरीत करुन निवड पध्दतीने तयार करण्यात आला आहे. हा वाण 165 ते 170 दिवसात तयार होतो. तसेच मर रोगास प्रतिकारक असून वांझ रोगास प्रतिबंधक आहे. या वाणाचे 100 दाण्यांचे वजन 11.70 ग्रॅम असून फुलांचा रंग पिवळा तर शेंगाचा रंग हिरवा आहे, तर या वाणाचा दाणा लाल रंगाचा आहे. या वाणाची सरासरी उत्पादन क्षमता हेक्‍टरी 18 ते 20 क्वींटल आहे.

News Reels

सोयाबीनचा एमएयुएस-725 वाण 

अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्‍पाव्‍दारे विकसित हा वाण महाराष्‍ट्र राज्‍याकरता प्रसारित करण्‍यात आला आहे. हा वाण 90 ते 95 दिवसात लवकर येणारा आहे. अर्ध निश्चित वाढ चिरकी मोठी व गडद हिरवी पाने, शेंगाची जास्‍त संख्या तसेच 20 ते 25 टक्के चार दाण्यांच्या शेंगा असलेला वाण आहे. बियाणांचा आकार मध्यम असून 100 दाण्यांचे वजन 10 ते 13 ग्रॅम आहे. हा वाण किड तसेच रोगास मध्यम प्रतिकारक असून हेक्‍टरी उत्‍पादन क्षमता सरासरी 25 ते 31.50 क्विंटल आहे.

करडई पिकांचे पीबीएनएस 154 (परभणी सुवर्णा) वाण 

अखिल भारतीय समन्‍वयीत करडई संशोधन प्रकल्‍पाव्‍दारे विकसित हा वाण महाराष्‍ट्र राज्‍याकरिता प्रसारित करण्‍यात आला आहे. हा वाण कोरडवाहू आणि बागायती लागवडीसाठी उपयुक्‍त असून यात तेलाचे प्रमाण अधिक (30.90 टक्के) आहे. हा वाण मर रोग आणि अल्‍टरनेरिया रोग आणि मावा किडीस सहनशील आहे. या वाणाचे हेक्‍टरी उत्‍पादन क्षमता कोरडवाहूमध्‍ये 10 ते 12 क्विंटल तर बागायतीमध्‍ये 15 ते 17 क्विंटल आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Potato : अबब! चक्क झाडाला लागले बटाटे; निसर्गाचा चमत्कार पाहून तुम्हीही अवाक् व्हाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here