नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १४ रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. बाजारांमध्ये ब्रेंट कच्च्या तेलाचा दर जानेवारीपासून घसरत असून, सध्या तो प्रति बॅरल ८१ डॉलरच्या खाली आहे. अमेरिकी क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ७४ डॉलरच्या आसपास आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याने ‘इंडियन बास्केट’साठी तेलाचा दर प्रति बॅरल ८२ डॉलरपर्यंत गेला आहे. मार्च महिन्यात तो ११२.८ डॉलरवर होता. याचा अर्थ देशांतर्गत बाजारात उपयुक्त ठरणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरांत आठ महिन्यांत ३१ डॉलरची घट झाली आहे.

‘एसएमसी ग्लोबल’च्या मते कच्च्या तेलाच्या दरात एका डॉलरची घसरण झाल्यास तेल वितरण कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या शुद्धीकरण प्रक्रियेत प्रति लिटर ४५ पैशांची बचत होते. या हिशेबाप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर १४ रुपयांची घट करण्याची आवश्यकता आहे.

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई, पुणेसह तुमच्या शहरातील दर लगेचच जाणून घ्या
दरांमध्ये घसरण का?
– चीनमध्ये सत्ताधीशांविरोधात आंदोलन तीव्र आणि कोव्हिड निर्बंधांत वाढ.

– निर्बंध घालूनही आंतरराष्ट्रीय बाजारांत रशियाचे आगमन.

– व्याजदरांत वाढ झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली सुस्ती.

इंधन कंपन्यांकडून सिलिंडरचे दर अपडेट; तुमच्या खिशाला भार की दिलासा? जाणून घ्या
इंधनदरांत घसरण कशासाठी?

१) तेल वितरण कंपन्यांच्या खर्चात बचत
सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता ‘इंडियन बास्केट’च्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ८५ डॉलर असण्याची गरज आहे. मात्र, हा दर सध्या ८२ डॉलरवर आहे. त्यामुळे तेलवितरण कंपन्यांची प्रति बॅरल (१५९ लिटर) शुद्धीकरणात २४५ रुपयांची बचत होत आहे.

२) कंपन्यांचा घटला तोटा
पेट्रोलियममंत्री हरदिपसिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी तेलकंपन्यांना पेट्रोलविक्रीतून नफा होत आहे. त्या उलट डिझेलविक्रीतून प्रति लिटर ४ रुपयांचे नुकसान होत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ब्रेंट कच्चे तेल १० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे डिझेलविक्रीतून कंपन्यांनाही फायदा होत आहे.

दिलासादायक बातमी! सीएनजी-पीएनजीच्या वाढत्या किमतींना आळा बसणार, सरकार नवा निर्णय घेणार
३) कच्चे तेल ७० डॉलरकडे

पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांच्या मते ब्रेंट कच्च्या तेलाच्या दरात घसरण होऊन ते प्रति बॅरल ७० डॉलरकडे वाटचाल करीत आहे. कच्च्या तेलाच्या दरात घट होत असली, तरी इंधनाचे दर घटण्यास वेळ लागणार आहे. आयातीपासून ते शुद्धीकरणापर्यंत ३ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घटल्यानंतर महिन्याने त्याचे परिणाम दिसून येतात.

गरजेच्या ८५ टक्के तेलाची आयात
देशाच्या एकूण गरजेपैकी ८५ टक्के तेलाची आयात केली जाते. आयात तेलाची किंमत डॉलरमध्ये देणे गरजेचे असते. त्यातच तेलाची किंमत वाढल्यास आणि डॉलर मजबूत झाल्यास इंधनाच्या किमतीत वाढ होण्याची भीती असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here