मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका करत शिवीगाळ केली होती. सत्तार यांच्या या कृतीने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. मंत्रिपदी असताना एका महिला नेत्याला शिवीगाळ करणाऱ्या सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तसंच काही महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत निवेदन दिलं. अखेर राज्यपालांनी या निवेदनाची दखल घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी माहिती दिली आहे.

‘महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्ह सर्वपक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार,’ असं ट्वीट फौजिया खान यांनी केलं आहे.

राज्यपालांनी सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींचे निवेदन कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वादग्रस्त मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Shivsena Vs Shinde Camp: संजय राऊत म्हणाले, ‘तुमचं करिअर संपलं’; हेमंत गोडसेंनी दिलं ओपन चॅलेंज

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी होत असतानाच खुद्द राज्यपालांनीच राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना कार्यवाही करण्यासाठीचे निवेदन पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here