पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पुण्यातील नेत्यांमध्ये सुरु असलेली अंतर्गत गटबाजीचे नाट्य काही केल्या संपायला तयार नाही. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरही पुण्यातील मनसे पक्षसंघटनेतील अंतर्गत कलह सुरुच आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी केली आहे. मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुण्यातील मनसे पक्षसंघटनेत याचे काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वीच निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत आपली नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, राज ठाकरे यांनी माझिरे यांची समजूत काढली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. निलेश माझिरे हे पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अलीकडेच वसंत मोरे हे पक्षावर पुन्हा एकदा नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी होणे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे.
उठ दुपारी अन् घे सुपारी असा राज ठाकरेंचा कार्यक्रम, सुषमा अंधारेंचा बोचरा वार
जून महिन्यात निलेश माझिरे यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच माझिरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, माझिरे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले होते. परंतु, निलेश माझिरे यांची त्यानंतरची एकूण वाटचाल ही तळ्यात-मळ्यात अशीच राहिली होती. गेल्यावेळी निलेश माझिरे यांनी मनसे न सोडण्यासाठी राजी करण्यात वसंत मोरे यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. वसंत मोरे हेच निलेश माझिरे यांना घेऊन राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे यांनी माझिरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माझिरे यांनी मनसेतच राहायचा निर्णय घेतला होता. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी निलेश माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीही करुन टाकली होती. परंतु, आता त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे.

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी एकाच वाक्यात राज ठाकरेंचा विषय संपवला, म्हणाले…

वसंत मोरेही मनसेवर नाराज

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेला वसंत मोरे यांनी विरोध केला होता. वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे आणि पुण्यातील मनसेचे नेते नाराज झाले होते. परंतु, वसंत मोरे शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. त्यानंतर वसंत मोरे शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांना भेटले होते. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी आपण पक्षातून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, अलीकडेच वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यामुळे वसंत मोरे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here