वाचा:
मुंबई, ठाणे भागातून दरवर्षी काही लाख चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या कोकणातील मूळगावी जातात. पाच, सात, अकरा दिवसांचा उरकून हे चाकरमानी पुन्हा माघारी परततात. यंदा करोनाची साथ असल्याने चाकरमान्यांच्या वाटेत अनेक विघ्ने आली आहेत. त्यात राज्य सरकारच्या याबाबत अनेक बैठका सुरू असल्या तरी अद्याप ठोस असा निर्णय झालेला नाही. क्वारंटाइन कालावधी १४ वरून ७ दिवसांवर आणता येईल का, हा सर्वात कळीचा मुद्दा असून केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली तर याबाबतचा निर्णय शक्य आहे. आता गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरला असताना हा प्रश्न अधिक जटील न बनवता, यावर तातडीने अंतिम निर्णय घ्यावा, अशी सगळ्यांचीच मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.
वाचा:
गणेशोत्सव आणि होळी हे कोकणातील सर्वात मोठे सण असतात. वर्षभर मुंबईत नोकरी करायची आणि गणेशोत्सव व होळीला मात्र न चुकता गावी जायचं, ही चाकरमान्यांसाठी परंपराच बनली आहे. असं असताना यंदा मात्र चाकरमान्यांनी गणपतीला गावी जाऊच नये, अशाप्रकारचा काहीतरी घाट घातला जात आहे. हा चाकरमान्यांवर अन्याय ठरेल, अशा शब्दांत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
करोनाची साथ आहे. संकट मोठं आहे. हे खरं असलं तरी ज्या पद्धतीने परराज्यातील मजुरांना श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी सोडण्यात आलं त्याच पद्धतीने चाकरमान्यांना गावी सोडण्यासाठी व परत आणण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. गेले तीन साडेतीन महिने हा चाकरमानी घरी आहे. कामावर जाऊ न शकल्याने त्याला पगारही मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्या स्वस्त प्रवासाची व्यवस्था सरकारने करायला हवी, अशी मागणीच पाटील यांनी केली.
वाचा:
क्वारंटाइनबाबतही पाटील यांनी महत्त्वाचे मत मांडले. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी करावी. या चाचणीत जो कुणी पॉझिटिव्ह आढळेल तो साहजिकच रुग्णालयात भरती होईल आणि ज्याचा अहवाल निगेटिव्ह असेल त्याला कोकणात जाता येईल. हे चाचणीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर जे चाकरमानी कोकणात जाणार आहेत त्यांना क्वारंटाइन ठेवण्याची कोणतीच गरज नाही. येथे निगेटिव्ह आलेली व्यक्ती दहा-बारा तासांच्या प्रवासानंतर पॉझिटिव्ह येण्याची मुळीच शक्यता नाही. याबाबत सरकारने वेळीच निर्णय घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. चाकरमान्यांना कोकणात जाऊ दिलं पाहिजे. त्यापासून कोणालाही रोखता नये. यंदा गणेशोत्सव दरवर्षीच्या उत्साहात साजरा करता येणार नाही, याचे सर्वांनाच भान आहे, असेही पाटील यांनी पुढे नमूद केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times