Health minister Tanaji Sawant | तानाजी सावंत यांनी ज्या रुग्णवाहिकेची चावी मागितली त्या गाडीचा चालक आतमध्ये दवाखान्यात काम करत होता. तानाजी सावंत यांनी चावी मागितल्यानंतर त्याला तिथे येण्यासाठी पाच ते सात मिनिटे लागली. त्यामुळे तानाजी सावंत चांगलेच संतापले. रुग्णवाहिकेची चावी मिळाल्यानंतर तानाजी सावंत यांनी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसत लॉग बुक आणि रजिस्ट्रार तपासले.

हायलाइट्स:
- गाड्यांचा ताफा रुग्णालय परिसरात येताच सगळ्यांचे चेहरे स्वागतासाठी उत्सुक झाले
- तानाजी सावंत थेट तिथे उभे असलेल्या रुग्णवाहिकेजवळ गेले
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पाहणी दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी सलोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी नेहमीप्रमाणे आरोग्य कर्मचारी हार व औक्षणाचे साहित्य घेऊन मंत्री महोदयांची वाट पाहत होते. गाड्यांचा ताफा रुग्णालय परिसरात येताच सगळ्यांचे चेहरे स्वागतासाठी उत्सुक झाले. मात्र, मंत्री महोदयांनी आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष टाकलं आणि थेट तिथे उभे असलेल्या रुग्णवाहिकेजवळ गेले. त्यावेळी त्यांनी ॲम्ब्युलन्सची चावी मागितल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
तानाजी सावंत यांनी ज्या रुग्णवाहिकेची चावी मागितली त्या गाडीचा चालक आतमध्ये दवाखान्यात काम करत होता. तानाजी सावंत यांनी चावी मागितल्यानंतर त्याला तिथे येण्यासाठी पाच ते सात मिनिटे लागली. त्यामुळे तानाजी सावंत चांगलेच संतापले. रुग्णवाहिकेची चावी मिळाल्यानंतर तानाजी सावंत यांनी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसत लॉग बुक आणि रजिस्ट्रार तपासले. तानाजी सावंत यांनी अचानक झाडाझडती घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
तानाजी सावंतांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंची बदली?
काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून बदली करण्यात आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नाराजी हे तुकाराम मुंढे यांच्या बदलीमागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. तेव्हाच तानाजी सावंत यांनी विरोध दर्शविला होता. परंतु, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची समजूत काढली होती. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कामाला सुरुवात केली होती. याबद्दल अनेकांनी तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारही केली होती. मात्र, तुकाराम मुंढे यांचा आतापर्यंतचा लौकिक पाहता नियमापुढे ते मंत्री किंवा नेत्यांची पत्रास बाळगत नाहीत. याची परिणती तुकाराम मुंढे यांच्या बदलीत झाली, असे सांगितले जाते.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.