लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी तरुणानं मालदिवची निवड केली. मात्र त्याची पत्नी त्याआधीच वेगळी झाली. तिच्यासोबत मिलीभगत असलेल्या टूर आणि ट्रॅव्हल्स कंपनीनं बुकिंगची रक्कम परत केली नाही. तरुणानं बुक केलेल्या पॅकेजवर त्याची पत्नी बहिणीसह मालदिवला पोहोचली. तिने मालदिवमधले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. ते पाहून तरुणाला धक्काच बसला.

अंकितनं डिसेंबरमध्ये मालदिवला जाण्यासाठी पॅकेज बुक केलं. त्यासाठी त्यानं साडे चार लाख रुपये मोजले. जानेवारी २०२२ मध्ये अंकित आणि सोनाक्षीचा वाद झाला. त्यानंतर सोनाक्षी माहेरी गेली. त्यामुळे अंकितनं कंपनीचे संचालक श्रीनाथ सुरेश यांच्याकडे पैसे परत मागितले. मात्र ते टाळाटाळ करू लागले. एप्रिल २०२२ मध्ये अंकित आणि सोनाक्षी दोन्ही कुटुंबाच्या सहमतीनं वेगळे झाले.
ऑगस्ट २०२२ मध्ये अंकितनं इन्स्टाग्रामवर सोनाक्षी आणि तिची बहिण इशिताचे मालदिवमधील फोटो पाहिले. ते पाहून अंकितला धक्काच बसला. अंकितनं लगेच श्रीनाथ सुरेश यांना फोन केला. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही. अंकितनं याबद्दल चौकशी केली. तेव्हा कंपनीनं इशिताला अंकितच्या जागी मालदिवला पाठवल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी अंकितनं पटेल नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोनाक्षी बन्सल, इशिता बन्सल आणि श्रीनाथ सुरेश यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.