केशरोपणासाठी उपचार घेणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. केशरोपण करणाऱ्या क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केला. अतहर रशिद असं तरुणाचं नाव आहे. रशिदच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चौघांना अटक केली. यातील दोघांनी रशिदवर सर्जरी केली होती. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

अतहर रशीद यांच्या पाठीमागे आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. राशीद कुटुंबाचा एकमेव आर्थिक आधार होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राशीद यांना अत्यंत वेदनादायी मृत्यू झाल्याचं त्यांच्या आई असिया बेगम यांनी सांगितलं. केशरोपण शस्त्रक्रियेमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला.
राशीद यांच्या संपूर्ण शरीरावर पुरळ आले होते. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी पोलीस ठाणं गाठून क्लिनिकमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. केशरोपण उपचार, शस्त्रक्रियांमध्ये चूक होऊ शकते. त्यामुळे जीव जावू शकतो, हे लोकांना समजावं यासाठी तक्रार करत असल्याचं असिया बेगम म्हणाल्या. पोलिसांनी कठोर कारवाई करावी. मी माझा मुलगा गमावला. अशी वेळ इतर कोणत्याही आईवर येऊ नये, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.