म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या नावाने निगडी मधील एका नामांकित हॉस्पिटलला २५ लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित हॉस्पिटलने दिलेल्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या लॅण्डलाइन फोनवर अज्ञताने फोन करून अशा प्रकारची खंडणी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.

करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी २५ लाख रुपये द्या, पैसे न दिल्यास तुमच्याकडे बघू, अशी धमकी देणारा फोन भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरातील एका नामांकित हॉस्पिटलला आला. दरम्यान, हॉस्पिटलमधील काही डॉक्टर हे ‘परिवारातील’ असल्याने त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांशी संपर्क साधत त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अशा प्रकारचा कोणताही फोन भाजपच्या कोणत्याही कार्यकर्ता अथवा पदाधिकाऱ्याने केला नसल्याचे त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगितले. तसेच तत्काळ याबाबत स्थानिक पोलिसांना भेटण्याची सूचना पाटील यांनी केल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. या सर्व प्रकारानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यातील निगडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फोन वरील कथित संभाषण

करोनाच्या संकटामुळे आम्हाला गोरगरिबांना मदत करायची आहे. त्यासाठी तुम्ही २५ लाख रुपये द्या. पैसे घेण्यासाठी पर्वती (पुणे) मधील एका कार्यकर्त्यास पाठवत आहे. पैसे न दिल्यास बघून घेऊ. हा सर्व प्रकार घडल्यावर हॉस्पिटलचे प्रमुख (मालक) असणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी संबंधित रूग्णालयाचे काम पाहणाऱ्या डॉक्टरशी संपर्क करण्यास सांगितले. त्यांच्याशीही खंडणी मागणाऱ्याने फोनवर बोलणे केले. ट्रू कॉलर या मोबाईल अपवर पाटील यांचे नाव दाखवत असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here