मुख्य सूत्रधारास ताब्यात घेऊन चौकशी
हर्षल लोकरे या महाविद्यालयीन तरुणास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याला या बनावट नोटा सुभाष काळे याने चलनात आणण्यासाठी दिल्या असल्याची माहिती समोर आली. पोलीस पथकाने सोलापूर-पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ दुचाकी (एम एच ४५ जे ३७०४) वर थांबलेल्या सुभाष काळे यास ताब्यात घेतले. त्यावेळी काळे याच्याकडेही बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी हर्षल लोकरे व सुभाष काळे या दोघांनाही अटक केली. दोघांकडून अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
बनावट नोटांप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. या बनावट नोटांचे रॅकेट सुभाष काळे हा चालवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. सुभाष काळे हा या बनावट नोटा कुठून आणत होता, या बनावट नोटांची छपाई कोठे होत होती, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि या रॅकेटच्या माध्यमातून बाजारात किती रुपयांच्या बनावट नोटा आलेल्या आहेत, या सर्व बाबींचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, या रॅकेटचा भांडाफोड करण्याचीकामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड, पिराजी पारेकर, नीलकंठ जाधवर, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, सलीम बागवान, रवी माने, घोरपडे, दिलीप थोरात आदींनी केली.