PM Modi in Gujrat | भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपचे पारडे जड मानले जात असले तरी गुजरातमधील वर्चस्व दाखवून देण्यासाठी मोदी-शाह जोडगोळीला ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.

हायलाइट्स:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आईला भेटतात तेव्हा…
- नरेंद्र मोदी आई हिरा बा यांच्या भेटीला
- मोदींनी आईशी मारल्या गप्पा
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईसोबत काहीवेळ घालवल्यानंतर ते येथून बाहेर पडले आणि पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. या भेटीवेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईशी गप्पा मारल्या. त्यांनी आपल्या आईची विचारपूसही केली. यापूर्वी देखील पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांच्या निकालानंतर मार्च महिन्यात आईची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन यांनी यंदाच्या जून महिन्यात १०० व्या वर्षात पदार्पण केले होते. तेव्हादेखील नरेंद्र मोदी यांनी हिरा बा यांना भेटायला गेले होते.
नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी गांधीनगर येथील रायसन परिसरात वास्तव्याला आहेत. गेल्या काही वर्षांपासून हिरा बा येथेच राहत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा मुक्काम दिल्लीतच असतो. ते अधुनमधून वेळ काढून आपल्या आईला भेटायला येत असतात.
गुजरातमध्ये मोदींची प्रतिष्ठा पणाला
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होईल. यानिमित्ताने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्यावेळप्रमाणे या निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेसचे कडवे आव्हान नाही. परंतु, यंदा आम आदमी पक्ष सर्व ताकदीने रिंगणात उतरल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत काहीशी चुरस निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये आपले किती वर्चस्व आहे, हे दाखवण्यासाठी मोदी-शाह जोडगोळीला विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपला अँटी-इन्कबन्सी फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे. या गोष्टीचा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस कितपत फायदा उठवणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
अरविंद केजरीवालांचं भाकीत
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी अलीकडेच गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक भाकीत केले होते. गुजरातमध्ये २७ वर्षांच्या कुशासनाचा अंत होऊन यंदा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करेल, असं सांगतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोऱ्या कागदावर त्यांची भविष्यवाणी लिहिली. यापूर्वी पंजाबमध्ये केजरीवालांनी वर्तविलेले भाकीत खरे ठरले होते. त्यामुळे आता गुजरातमध्येही आप तसाच चमत्कार करुन दाखवणार का, हे पाहावे लागेल.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.