Samruddhi express way in Maharashtra | राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन लवकरच होणरा आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर टेस्ट राईड घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. फडणवीस यांनी जवळपास १५० किमीच्या वेगाने गाडी पिटाळली.

हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीत होते
- देवेंद्र फडणवीस हे स्वत: गाडी चालवत होते
- रमतगमत प्रवास करूनही नागपूर ते शिर्डी हे ५२९ किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच तासांमध्ये पार
यादरम्यान जालना येथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. गेल्या काही दिवसांमध्ये ग्रामीण भागांमध्ये वीजबिल न भरल्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. यावरुन जालन्यात संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवले. शिंदे आणि फडणवीस आपल्याशी बोलतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, हा ताफा शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता पुढे निघून गेला.
समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. फडणवीस सरकारच्या काळातच या महामार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हे काम पुढे नेले. महाविकास आघाडीकडूनच या महामार्गाचं लोकार्पण केलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे फडणवीसांना आपल्याच कार्यकाळात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याची संधी नव्याने चालून आली. त्यानुसार येत्या ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले जाईल.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये
विदर्भ, मराठवाड्यातील मागासभागांना राज्यातील उर्वरित परिसराशी जोडण्याच्यादृष्टीने समृद्धी महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या ११ डिसेंबरला या महामार्गाच्या ५२९ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. पण या महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर इतकी आहे. समृद्धी महामार्गात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे अशा १० जिल्ह्यांचा समावेश आहे. यातून २६ तालुके जोडण्यात येत असून, ३९२ गावांतून महामार्ग जाणार आहे. ७१० किलोमीटर लांबीच्या महामार्गावर १७०० पूल आहेत. यातील ४०० पुलांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
असा आहे समृध्दी महामार्ग
* लांबी -701 किलोमीटर
* खर्च -55 हजार 335 कोटी
* वाहन वेगमर्यादा – 150 किमी प्रतितास (डोंगराळ भागात
120किमी)
* पहिला टप्पा – 520 किलोमीटर
* रस्त्यांची रुंदी – 120 मिटर (डोंगराळ भागात 90 मी)
* इंटरचेंज -24
* रस्तालगतचे नवनगरे -18
* मोठे पुल – 33
* लहान पुल – 274
* बोगदे – 6
* रेल्वे ओव्हर ब्रिज – 8
* फ्लाय ओव्हर – 65
* कल्हर्ट – 672
* मार्गक्रमण – 10 जिल्हे, 26 तालुके, 292 गावे
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.