Ratnagiri local news | उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या आमदारांमध्ये वैभव नाईक आणि राजन साळवी यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे गटातील नेत्यांना फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. अशातच आता वैभव नाईक आणि राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीची नोटीस आल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

हायलाइट्स:
- राजन साळवींना एसीबीची नोटीस
- वैभव नाईक आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला सामोरे जाणार
- वैभव नाईक यांच्याकडे २००२ ते २०२२ पर्यंतच्या सर्व उत्पन्न आणि खर्चाचा तपशील मागवला
एसीबीने वैभव नाईक यांच्याकडे २००२ ते २०२२ पर्यंतच्या सर्व उत्पन्न आणि खर्चाचा तपशील मागवला होता. या सर्व कागदपत्रांसह जबाब नोंदवण्यासाठी यावे, असे आदेश एसीबीकडून वैभव नाईक यांना देण्यात आले होते. त्यामुळे आजच्या चौकशीत एसीबीचे अधिकारी वैभव नाईक यांना काय प्रश्न विचारणार, हे पाहावे लागेल. या चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार, यावर पुढील कारवाईची दिशा ठरेल. ठाकरे गटातील अनेक आमदार आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना राजन साळवी आणि वैभव नाईक अजूनही मातोश्रीशी निष्ठावंत राहिले आहेत. मात्र, आता एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर त्यांचा निर्धार किती दिवस टिकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनाही एसीबीची नोटीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी शिंदे गटात सामील होतील, अशी चर्चा होती. परंतु, अद्याप तसे घडलेले नाही. या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांना आलेल्या नोटीसमागे सूडाचे राजकारण असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. पण मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीन, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे.
मी गेली चाळीस वर्षे शिवसेनेत आहे. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. शिवसेनेत मध्यंतरी स्थित्यंतर झालं. पण मी शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. माझ्याकडून कधीही कोणतेही चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही. कितीही कोणत्याही नोटीसा येऊ देत. आपण त्यांना भीक घालत नाही, अशी स्पष्ट व रोखठोक भूमिका राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना सांगितले होते.
मला अटक केली तरी भाजप आणि राणेंसमोर झुकणार नाही: वैभव नाईक
आमदार वैभव नाईक यांनीदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आलेल्या नोटीसनंतर भाजपवर टीकास्त्र डागले होते. माझी चौकशी होईल, त्याला मी सामोरा जाईन. मात्र, माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशोबी असेल तर मला फासावर लटकवा. परंतु, मला अटक करून मी भारतीय जनता पार्टी किंवा राणेंसमोर झुकेन, असे कोणाला वाटत असेल तर हे शक्य होणार नाही. कितीही प्रयत्न करा मी कारवाईला भीक घालणार नाही व दबावाला झुकणार नाही, असे वैभव नाईक यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times