ढाका: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आपल्या बांगलादेश दौऱ्याची खराब सुरुवात केली. तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेतील रोमहर्षक सामन्यात भारताला एका विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. ढाका येथील या सामन्यात दुसऱ्या डावामध्ये भारताने आपले पूर्ण वर्चस्व राखले होते, पण एका चुकीमुळे भारताने हा सामना गमावला. मेहदी हसन मिराजच्या तुफानी इनिंगच्या जोरावर बांगलादेशने सामन्यात विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय संघाने केवळ १८७ धावांचे लक्ष्य दिले होते. असे असतानाही टीम इंडियाने बांगलादेशवर प्रचंड दबाव टाकला होता आणि यजमान संघ एका टप्प्यावर १३६ धावांत ९ खेळाडू बाद असा होता. हा सामना भारतीय संघ जिंकणार हे निश्चित असतानाच बांगलादेशच्या मेहदी हसनने नाबाद ३८ धावा करत सामन्याचा चेहरा मोहरा बदलूनच टाकला.

पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. रोहित शर्माच्या मते या पराभवासाठी भारताचे फलंदाज जबाबदार आहेत. भारताने गोलंदाजी तर शानदार केली पण फलदांजीमध्ये काही विशेष कामगिरी करू शकला नाही. जर २५-३० धावा संघाकडून अधिक केल्या गेल्या असत्या तर आज सामन्याचा निकाल काही वेगळा असता. टीम इंडियाने २४०-२५० धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघाला दिले पाहिजे होते, असे कर्णधार म्हणाला.

२४०-२५० धावांचे लक्ष्य

सामन्यानंतर कर्णधार म्हणाला, “हा सामना खूपच रोमांचक होता. सामन्याच्या एका टप्प्यावर आम्ही शानदार पुनरागमन केले. पण आम्हाला चांगली फलंदाजी करता आली नाही. १८६ ही चांगली धावसंख्या नव्हती पण आम्ही गोलंदाजी चांगली केली. पण बांगलादेशने दबाव असतानाही स्वतःला सावरले. आम्ही सामन्यामध्ये ४० षटकांपर्यंत शानदार गोलंदाजी करत विकेट्स मिळवले. पण आमच्याकडे चांगली धावसंख्या नव्हती. २५-३० धावा जर अधिक असत्या, तर सामना जिंकण्यात मदत झाली असती. आम्हाला २४-२५० धावांपर्यंत जाणे गरजेचे होते.”

पराभवासाठी कोणताही बहाणा करणार नाही.

पुढे रोहित म्हणाला, ‘तुम्ही एकापाठोपाठ एक विकेट्स गमावत राहिल्यास काहीही सोपे होत नाही. अशा विकेटवर कसे खेळायचे, हे यातून शिकले पाहिजे. आम्ही कोणतीही सबब करणार नाही. अशा खेळपट्टीवर खेळण्याची आम्हाला सवय असल्याने मी कोणतीही गय करणार नाही.

तो म्हणाला, ‘पुढील एक-दोन सराव सत्रात सुधार करू, हे मला खरंच माहित नाही. माझा विश्वास आहे की ही फक्त दबाव हाताळण्याची बाब आहे. मला आशा आहे की हे लोक यातून शिकतील. या परिस्थितीत काय करावे हे आम्हाला माहित आहे. आता पुढच्या सामन्याच्या प्रतीक्षेत आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here