अदानी समूहाने अप्रत्यक्षपणे नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (एनडीटीव्ही) मधील २९.१८ टक्के भागीदारी एका छोट्या कंपनीचे अधिग्रहण करून विकत घेतली होती. त्यानंतर समूहाने मीडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांना ओपन (खुली) ऑफर दिली, जी आज ५ डिसेंबर रोजी बंद होईल.
५३.२७ लाख शेअर्ससाठी ऑफर मिळाल्या
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, अदानीने ओपन ऑफर अंतर्गत एनडीटीव्हीच्या अल्पसंख्याक भागधारकांकडून १.६७ कोटी किंवा २६ टक्के शेअर्स २९४ रुपये प्रति शेअर दराने खरेदी करण्याची ऑफर दिली. यापैकी अदानी समूहाला आतापर्यंत ५३.२७ लाख शेअर्सच्या ऑफर मिळाल्या आहेत. यापैकी कॉर्पोरेट गुंतवणूकदारांनी सर्वाधिक ३९.३४ लाख शेअर्स ऑफर केले तर किरकोळ गुंतवणूकदारांनी सात लाखांहून अधिक शेअर्सची ऑफर दिली आहे. तसेच पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी ६.८६ लाख शेअर्ससाठी ऑफर दिली.
एनडीटीव्ही शेअर्सची स्थिती
अदानींची ओपन ऑफर, एनडीटीव्हीच्या सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत देण्यात आली आहे. खुल्या ऑफर अंतर्गत, शेअरची किंमत २९४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली, तर एनडीटीव्हीचे शेअर्स शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजमध्ये ४१४.४० रुपयांवर बंद झाले. आतापर्यंत ऑफर केलेले शेअर्स एनडीटीव्ही च्या शेअर्सच्या ८.२६ टक्के आहेत. याशिवाय, अदानी समूहाने यापूर्वीच २९.१८ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. तर आता एकत्रितपणे, मीडिया कंपनीमध्ये समूहाची भागीदारी ३७.४४ टक्के असेल, जे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या ३२.२६ टक्के हिस्सापेक्षा जास्त आहे.
अदानींना मिळणार अधिकार
यापूर्वी एनडीटीव्हीमध्ये प्रवर्तकांची भागीदारी ६१.४५ टक्के होती. यापैकी १.८८ कोटी शेअर्स किंवा २९.१८ टक्के भाग आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडकडे होते, जे अप्रत्यक्षपणे गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विकत घेतले. तसेच आता एनडीटीव्हीचा सर्वात मोठा भागधारक बनल्यानंतर अदानी समूहाला कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षांसह किमान दोन संचालकांची नियुक्ती करण्याचा अधिकार मिळणार आहे.