मुंबई : शिवसेना उद्धव बाळाासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत बैठक झाली आहे. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये झालेल्या भेटीबाबत प्रचंड गोपनीयता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र माध्यमांना या भेटीची माहिती मिळाल्याने भेटीबाबत गुप्तता बाळगण्याचा ठाकरे-आंबेडकरांचा प्रयत्न फसला. खरंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीररित्या एका मंचावर आले होते. असं असतानाही दोन्ही नेत्यांनी आजच्या भेटीबाबतची माहिती सार्वजनिक होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. या भेटीत शिवसेना ठाकरे गट आणि वंचित आघाडी कशा प्रकारे एकत्र येऊ शकतात, याबाबत विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षासमोर पुन्हा राजकीय भरारी घेण्याचं खडतर आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांना आपल्या राजकीय पाठिंब्याचं रुपांतर निवडणुकीतून मिळणाऱ्या यशात करायचं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सध्याची राजकीय गरज लक्षात घेता आघाडी करण्याबाबत एकमत झाल्याचे समजते. आज झालेल्या बैठकीला ठाकरे आणि आंबेडकर यांच्यासह शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

सांगलीतील ४० गावं महाराष्ट्रात ठेवण्यासाठी उदय सामंतांची मोठी घोषणा, म्हणाले….

भेटीत कोणत्या मुद्द्यांवर खलबतं झाली?

मुंबईसह सध्या राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधील महानगरपालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या बैठकीत या महानगरपालिका निवडणुकांना एकत्रितपणे कशा प्रकारे सामोरे जाता येईल, याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडी ठाकरेंसोबत आल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय असेल, त्यांना कशाप्रकारे विश्वासात घेता येईल, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली आहेत.

जळगाव दूधसंघाच्या निवडणुकीत सासू विरुद्ध सून, रक्षा खडसेंचा मंदा खडसेंविरोधात प्रचार

महापालिका निवडणुकांसह आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही आघाडी करायचं ठरल्यास जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल, वंचित आघाडीची युती केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असेल की प्रकाश आंबेडकर आपला पक्ष थेट महाविकास आघाडीसोबत आणणार, याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये आजच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आलं.

दरम्यान, या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही लगेच याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here