नागपूरः टोळीयुद्धातून कुख्यात गुंड व त्याच्या पत्नीवर गोळीबार करण्यात आला. यात दोघेही जखमी झाले. ही थरारक घटना सोमवारी सकाळी कळमेश्वरमधील लोहकरे ले-आऊट येथे घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गणेश मेश्राम (३२) व त्याची पत्नी प्रिया मेश्राम (वय २८), अशी जखमींची नावे असून, दोघांवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गोलू ऊर्फ निखिल मलिये, माकोडे आणि फारुख या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपूर्वी गणेश हा कुटुंबासह जयताळा येथून कळमेश्वर येथे आला. तो खाडे यांच्याकडे पहिल्या माळ्यावरील घरात भाड्याने राहायला लागला. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेले चार हल्लेखोर तेथे आले. घरमालकीनने त्यांना हटकले. एकाने घरमालकीनला पिस्तूलचा धाक दाखविला. तिघे पहिल्या माळ्यावरील गणेश याच्या घरात घुसले. गणेश याला बघताच तिघांनी गोळीबार केला. एक गोळी गणेश याच्या पाठीत तर दुसरी मांडीत घुसली. गोळीबाराच्या आवाजाने त्याची पत्नी आली. तिच्या पोटावर हल्लेखोराने गोळी झाडली. गणेश हा उडी मारुन दुसऱ्या इमारतीवर गेला. याचदरम्यान गोळीबाराच्या आवाजाने नागरिक जमले. नागरिक पकडतील या भीतीने चारही हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हेशाखचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी चौकशीदरम्यान गोलू व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिपर्यंत तिघांची कसून चौकशी सुरू होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here