करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहान केले असले, तरी पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. लॉकडाउनमुळे दोन महिने बंद असलेले जूनच्या पंधरावड्यात सुरू झाले, तेव्हापासून अपॉइन्मेंट फुल होत आहेत. दिवसाला साडेसहाशे ते सातशे पासपोर्ट अर्ज येत आहेत. शहरात पुन्हा कडक केल्याने पासपोर्ट कार्यालयाने सध्या पुण्याच्या अपॉइन्मेंट थांबवल्या आहेत.
करोनामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस जाहीर झालेल्या लॉकडाउनंतर पासपोर्ट अपॉइन्मेंटची प्रक्रिया देशभरातच थांबविण्यात आली होती. मे महिन्यात ज्या राज्यात परिस्थिती सुधारली तेथील पासपोर्ट सेवा केंद्रे पुन्हा सुरू झाली. मात्र, महाराष्ट्र रेड झोनमध्ये असल्याने येथील पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू झाली नव्हती. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सरकारची मान्यता मिळाल्यावर पुण्यामध्ये मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले. सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी केंद्रात प्रत्येक दिवसाला सुरुवातील दोनशे अपॉइंटमेंट सुरू केल्या. टप्प्याटप्याने यात वाढ करून जुलैच्या पंधरावड्यात दिवसाला सातशे अपॉइंमेंट सुरू केल्या होत्या. मात्र, शहरातील करोनारुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा लॉकाडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे पासपोर्ट अपॉइन्मेंट सध्या थांबविण्यात आल्या आहेत.
दर वर्षी मार्च महिन्यापासून पासपोर्ट अपॉइन्मेंटची मागणी वाढायला सुरुवात होते. मुलांच्या शाळांच्या परीक्षा संपल्याने पालक पासपोर्टसाठी अर्ज भरतात, याच काळात उच्च शिक्षण घेणारी मुलेही पासपोर्टसाठी अर्ज भरतात. यंदा सुट्टीच्या काळात पासपोर्ट सेवा केंद्र बंद राहिल्याने अनेकांच्या पासपोर्टच्या नूतनीकरणाच्या तारखा उलटून गेल्या, तर काहींच्या तारखा जवळ आल्या आहेत. विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पासपोर्ट काढायचे आहेत. त्यामुळे अर्जदार मिळेल त्या तारखेला पासपोर्टसाठी अर्ज भरत आहेत.
‘पुण्यातील मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले. सुरुवातीला आम्ही दिवसाला दोनशे अपॉइन्मेंट दिल्या. टप्प्याटप्प्याने वाढवून ही संख्या सातशेपर्यंत आणली. सुरक्षित वावराचे नियम, अर्जदार, कर्मचारी, अधिकाऱ्यांची सुरक्षितता याबद्दल काळजी घेतली जात आहे. मात्र, सध्या अपॉइन्मेंट थांबवल्या आहेत,’ असे पुणे विभागाचे मुख्य पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले यांनी सांगितले.
…
सध्या शहरात पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्याने गेल्या आठवड्यापासून आम्ही अपॉइन्मेंट थांबवल्या आहेत. सरकारकडून पुढील सूचना आल्या की अपॉइन्मेंट सुरू होतील.
– अनंत ताकवले, मुख्य पासपोर्ट अधिकारी, पुणे विभाग
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times