देशभरात सध्या लग्न सोहळे सुरु आहेत. या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली असून आजच्या दरात घसरण झाली आहे. सणासुदीपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र आज मौल्यवान धातूंचे दर काहिसे खाली घसरले आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, सोमवारी स्थानिक बाजारात स्पॉट सोन्याच्या दरात वाढ झाली होती. सोन्याचा भाव २२७ रुपयांनी वाढून ५४,३८६ रुपयांवर बंद झाला, तर मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव ५४,१५९ वर होता. तसेच चांदी ११६६ रुपयांनी वाढून ६७,२७० रुपयांवर बंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती ४.१० डॉलर (०.२३ टक्के) ने वाढल्या आणि १७७३ डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे तर ते जवळजवळ सपाट स्थितीत आहे. त्याची किंमत ०.११ डॉलर किंवा ०.४९ टक्के वाढीसह २२.३४ डॉलर प्रति औंस पातळीवर राहिली.
साप्ताहिक स्पॉट किंमतीत वाढ
गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या तसेच चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला (२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर) २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,८५२ रुपये होता, जो शुक्रवारपर्यंत ५३,६५६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याच वेळी, ९९९ शुद्धतेच्या चांदीचा भाव ६२,११० रुपयांवरून ६४,४३४ रुपये प्रति किलोपर्यंत वाढला.
सोन्यावरील आयात शुल्क कमी होणार?
भारत सरकार सोन्याचे आयात शुल्क कमी करण्याची तयारी करत आहे. असे झाल्यास सोन्याच्या तस्करीच्या घटना कमी होतील, अशी माहिती ब्लूमबर्गने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने दिली. भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक असून देशातील सर्वाधिक सोने आयात केले जाते. अर्थ मंत्रालय आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही.