Maharashtra politics | बारसू-सोलगाव रिफायनरीला सध्या स्थानिकांचा विरोध होत आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात कोकणाला सर्वतोपरी मदत आणि निधी पुरवण्याचे आश्वासन दिले. कोकणाच्या विकासासाठी काजू, सुपारी आणि नारळ उत्पादक आणि पर्यटनाच्या विकासासाठी अधिक चांगल्या योजना सुरु केल्या जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.

 

Konkan Refinery: काही लोकांना कोकण मागास ठेवायचाय, पण आम्ही रिफायनरी उभारूच: देवेंद्र फडणवीस
Konkan Refinery: काही लोकांना कोकण मागास ठेवायचाय, पण आम्ही रिफायनरी उभारूच: देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • अर्थमंत्री म्हणून मी देखील कोकणाच्या पाठिशी उभा आहे
  • रिफायरनरीमुळे कोकणातील १ लाख लोकांना थेट रोजगार
  • काही लोकांनी रिफायनरीबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या
मुंबई: काही लोकांना कोकणाचा विकास नको. त्यांना कोकणाला मागास ठेवायचे आहे. जेणेकरून त्यांना भावना भडकावून राजकारण करता येईल. पण आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही कोकणात रिफायनरी करूनच दाखवू, असे ठाम वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात बोलत होते. आम्ही कोकणी माणसाच्या हाताला काम देऊ आणि कोकणातील पर्यटन आहे त्यापेक्षा चांगले करु, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. मागच्या काळात युतीचं सरकार असताना, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कोकणासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या. गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने या सर्व योजना बंद केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना कोकणाने नेहमीच भरभरून दिलं ते राज्याचे नेते असताना सर्वाधिक अन्याय कोकणावर झाला, हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण आता कोकण ज्यांची कर्मभूमी आहे, असे एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तसेच अर्थमंत्री म्हणून मी देखील कोकणाच्या पाठिशी उभा आहे. त्यामुळे आता कोकणवासियांनी चिंता करण्याचे कारण नाही. यापूर्वीच्या काळात बंद झालेल्या कोकणासाठीच्या योजना पुन्हा सुरु केल्या जातील. कोकणाच्या विकासासाठी काजू, सुपारी आणि नारळ उत्पादक आणि पर्यटनाच्या विकासासाठी अधिक चांगल्या योजना सुरु केल्या जातील. हे काम आणखी पुढच्या टप्प्यात नेण्याचे काम राज्य सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या बैठकीला राजन साळवींची हजेरी, उदय सामंतांच्या कौतुकाने भुवया उंचावल्या

कोकणी माणूस एकदा पंगा घेतला तर घरदार विकूनही लढतो: फडणवीस

कोकणाची संस्कृती माझ्यासमोर आहे. कधी कधी मला कळतच नाही की, कोकणातील आंबा जास्त गोड आहे की, कोकणी माणूस जास्त गोड आहे. कोकणी माणूस हा एरवी सरळ आणि निर्मळ आहे. पण त्याने एखाद्याशी पंगा घेतला तर घरदार विकून, कोर्टकज्जे करून, चार पिढ्या हा पंगा संपवल्याशिवाय राहत नाही. चांगल्याकडे दुर्लक्ष करून नका, हे मी नेहमीच सांगतो. चांगल्याला अधिक चांगलं कसं करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तीन प्रोजेक्ट हातचे गेले, म्हणून ‘या’ प्रकल्पासाठी धावाधाव, सामंतांनी भावाला मैदानात उतरवलं

रिफायनरीमुळे कोकणाच्या पर्यावरणाला कोणताही धोका नाही: देवेंद्र फडणवीस

कोकणातील बारसू-सोलगाव रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यापूर्वीच्या काळात आम्ही कोकणात रिफायनरी आणायची ठरवली तेव्हाच ही ग्रीन रिफायनरी असेल, असे सांगितले. या रिफायनरीसाठीचे तंत्रज्ञान नवीन होते, त्यामध्ये कोणतेही उत्सर्जन होणार नाही. त्यासोबत आपण अटही टाकली होती की, ५००० एकरात फक्त हिरवळ असावी. या रिफायरनरीमुळे कोकणातील १ लाख लोकांना थेट रोजगार आणि पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असता. मात्र, काही लोकांनी रिफायनरीबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या. रिफायनरी झाल्यास कोकणात आंबा येणारच नाही, असे सांगितले गेले. गुजरातमध्ये जामनगर येथे देशातील सर्वात महत्त्वाची रिफायनरी आहे. मात्र, त्या परिसरातून कोकणाच्या खालोखाल सर्वात जास्त आंबा परदेशात निर्यात होतो. मात्र, काही लोकांना कोकण मागास ठेवायचा आहे. त्यामुळे हे लोक रिफायनरीला विरोध करत आहेत. परंतु, आमचे सरकार याठिकाणी रिफायनरी उभारणारच, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here