‘भाषावार प्रांतरचना ही काही साधीसुधी घटना नाही. त्या त्या प्रांतातल्या इतर अल्पसंख्याक भाषिकांच्या भवितव्याविषयी माझ्या मनात शंका नाही; मात्र बहुसंख्याकांची दृष्टी विशाल हवी आणि अल्पसंख्याकांच्या ठिकाणी सहिष्णुता हवी. प्रत्येक प्रांतातल्या अल्पसंख्याकांच्या मनातील भीती नाहीशी होण्यासाठी आणखी पुष्कळ गोष्टी करायला हव्यात,’ निजामाच्या क्रूर राजवटीच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारून स्वातंत्र्यानंतर पाच भाषिक समूहांची सैतानी जाचातून मुक्तता अनुभवणारे द्रष्टे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या ग्रंथातील हे उद्धरण आहे. ‘हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी’ लिहिताना स्वामीजी भाषिक, प्रांतिक, धार्मिक, राष्ट्रीय अशा समस्यांचा सांगोपांग ऊहापोह करतात आणि भविष्यात हा बहुभाषी देश नीट चालायचा, तर ‘सहिष्णुता आणि सामंजस्य’ हाच खरा मार्ग आहे, असे खात्रीने बजावतात. सध्या जे काही चालू आहे, त्यात सगळ्यांनी नेमकी यालाच सोडचिठ्ठी दिली आहे. भाषावार प्रांत, त्यांनी बनलेला हा विशाल भारत आणि प्रत्येक राज्यात वास्तव्य करणारे बहुभाषी नागरिक यांच्या कल्याणापेक्षा मतांचे राजकारण मोलाचे ठरले, की भाषा बदलते. आसन डळमळीत असणारे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ज्या भाषेत बोलत आहेत, त्याने त्यांचे राजकारण साधेलही; मात्र आधीच अशांत आणि अस्वस्थ असणारा सीमाभाग पेटून उठेल. दोन्ही बाजूंनी संघर्ष वाढेल. हे कुणालाही परवडणारे नाही. सीमा भागात महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या गाड्यांवर होणारे हल्ले, म्हणजे उद्या महाराष्ट्रातल्या तशाच हिंसक प्रतिक्रियांना निमंत्रण आहे. यातून सीमा प्रश्न सुटणार नाही. केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन्हीकडे निष्पाप तरुणांच्या पाठीवर वळ तेवढे उठतील.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. तो निकाल कधी लागेल, हे माहीत नाही. स्वातंत्र्य मिळून सात दशके झाली आणि संयुक्त महाराष्ट्र होऊन पाच दशके उलटून गेली. प्रश्न न्यायालयात किंवा सहमतीने सुटत नाही, तोवर सर्व भागांत सर्व भाषिक नागरिकांचे शांततामय सहजीवन खरोखर अशक्य आहे का? इतके दिवस निर्माण न झालेला वेगळाच तिढा या वेळेला समोर येतो आहे. तो म्हणजे, कर्नाटक, तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या सीमावर्ती राज्यांमध्ये जाण्याची सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या गावांनी केलेली मागणी. अशी मागणी करण्यामागे दबाव टाकण्याचे राजकारण आहे असे गृहीत धरले, तरी अशी मागणी अनेक गावांना करावीशी वाटते, ही आजचे व कालचे राज्यकर्ते आणि सुस्त नोकरशाही यांना शरम वाटायला हवी, अशी गोष्ट आहे. कोणताही संघर्ष फुलून येताना दिसला, की विरोधकांची कोंडी करण्यासाठी जिवाचा आटापिटा करायचा, हीच कोत्या राजकारणाची सध्याची रीत आहे. तेच महाराष्ट्रात चालले आहे; मात्र १९६०मध्ये मोठ्या उमेदीने महाराष्ट्रात सामील झालेल्या या ‘सीमान्त’ भागांना कुंपण ओलांडून पलीकडे जावेसे का वाटते, याची दखल कोणी घेणार आहे की नाही? या सीमान्त भागांची स्पंदने जाणून घेण्याचा एक प्रयोग ज्येष्ठ संपादक सुनील कर्णिक यांच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी झाला होता; पण सर्व पक्षांच्या सरकारांनी आजवर त्यांच्यासाठी भरीव असे काय केले? सीमेवरच्या जत तालुक्यातील गावे ‘पाणी द्या, नाही तर जातो कर्नाटकात’ असे म्हणतात, याची शरम आज तारस्वरात ओरडणाऱ्या किती नेते, आमदार आणि मंत्र्यांना वाटते?

बेळगाव आणि परिसरातील मराठी भाषकांच्या भावना तीव्र आहेत. तीन पिढ्या झाल्या, तरी त्यांची ऊर्मी त्याच तीव्रतेने तेवते आहे. ‘तुम्ही आमच्या हद्दीत राहता म्हणजे आमचे गुलाम आहात,’ अशा तोऱ्याने कर्नाटक सरकारने वागू नये. तसे ते वागतील, तर महाराष्ट्राने राजकीय मतभेद बाजूला ठेवून याचे उत्तर द्यावे. मराठी मंत्र्यांनी सीमा भागात येऊ नये, असे बंधन घालणारे कर्नाटक सरकार कोण लागून गेले? ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ ही संघटना मराठी, तमिळ, हिंदी अशा साऱ्यांनाच पाण्यात पाहते. अशा संघटनांना काळाची पावले समजत नाहीत आणि त्यांचे लांगूलचालन केल्याशिवाय मोठ्या पक्षांचे भागत नाही. महाराष्ट्रासहित सर्वच राज्यांत हे होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन आज सुरू होत आहे. तेव्हा तिथे सगळे मराठी खासदार पक्षभेद विसरून हा मुद्दा मांडतील, अशी अपेक्षा आहे. वाढते तापमान मात्र आधी खाली आणले पाहिजे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी ग्रंथाचा समारोप करताना म्हटले होते, ‘भारतासारख्या विस्तृत देशात कोणताही आकृतिबंध स्वीकारला, तरी कसल्या ना कसल्या अडचणी उत्पन्न होत राहणारच. सहिष्णुता आणि समजूतदारपणाच्या वृत्तीनेच या अडचणींतून मार्ग निघतील.’ नेमक्या याच गुणांचा त्याग करून कानडी नेते सध्या आक्रमक बनले आहेत. यातून कुणाचाच लाभ होणारा नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे जगाला शिकवायचे आणि शेजाऱ्यांचा मात्र गळा पकडायचा, ही कसली रीत झाली?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here