मुंबई: भारत भेटीवर आलेल्या २४ वर्षीय कोरियन यूट्यूबर ह्योजेआँग पार्कला गेल्या आठवड्यात कटू प्रसंगाला सामोरं जावं लागलं. खारमध्ये गेल्या मंगळवारी फिरत असताना पार्कचा भररस्त्यात विनयभंग झाला. जवळपास ९ ते १० तास लाईव्ह स्ट्रिमिंग करून हॉटेलवर परतत असताना रात्री ११.५० च्या सुमारास एका तरुणानं पार्कचा जबरदस्तीनं हात धरला. तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीनं पार्कशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिचा नंबर मागितला. यानंतर तिचा पाठलाग केला. मात्र या घटनेनंतरही माझं भारतावरचं प्रेम कमी झालेलं नाही. उलट ते वाढलं आहे. या देशात मला जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरू शकणार नाही. मी भारतामधील माझं वास्तव्य वाढवण्याचा विचार करत असल्याचं पार्कनं सांगितलं.

कोविड-१९ येण्याच्या आधीपासूनच मला भारतात यायचं होतं. मात्र माझ्या मायदेशातील (दक्षिण कोरियातील) लोकांच्या मनातील भारताबद्दलची प्रतिमा चांगली नाही. भारत महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं त्यांना वाटतं. माझ्या प्रियकरानं जूनमध्ये भारताला भेट दिली. आपल्या देशातील लोकांची मानसिकता भारताबद्दलच्या बातम्या बघून तयार झाल्याचं त्यानं मला सांगितलं. त्यामुळे मी भारतात आले, असं पार्क ‘बॉम्बे टाईम्स’शी बोलताना म्हणाली.

मी ३ नोव्हेंबरला दिल्लीत आले. तिथे ५ दिवस थांबले. मात्र तिथली थंडी मला सहन झाली नाही, असं पार्कनं हसत सांगितलं. त्यानंतर मी वाराणसीला गेले. तिथून ९ नोव्हेंबरला मुंबईत आले. इथे आल्यानंतर माझा प्रियकर आजारी पडला. त्यामुळे मी शहर भ्रमंतीसाठी फारशी बाहेर पडले नाही. २९ नोव्हेंबरला मी फिरत असताना तो दुर्दैवी प्रकार घडल्याचं पार्क म्हणाली.
कोरियन तरुणीच्या मदतीसाठी धावले मुंबईतील दोन तरुण, काय घडलं होतं त्या रात्री; वाचा INSIDE STORY
‘त्यानं माझा हात धरला अन् बाईककडे घेऊन गेला’
२९ नोव्हेंबरला मी मुंबई फिरत होते. जवळपास ९ ते १० तास लाईव्ह स्ट्रिमिंग करून रात्री पावणे बाराच्या सुमारास मी हॉटेलवर परतत होते. त्यावेळीही रस्त्यावर गर्दी होती. रस्त्याच्या शेजारी असलेला एक तरुण मला पाहून ‘आय लव्ह यू’ म्हणाला. मी त्याला ‘आय लव्ह यू बॅक’ म्हणत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर तो माझ्याजवळ आला. मी रस्त्यावर असलेल्या अज्ञातांशी बोलते. अनोळखी लोकांशी बोलायला मला आवडतं. पण त्या तरुणाच्या कृतीनं मला धक्काच बसला, अशा शब्दांत पार्कनं घटनाक्रम सांगितला.

तरुणानं त्याचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी लाईव्ह असल्याचं त्याला सांगितलं. त्यानं यापुढे काही वेडेपणा करू नये यासाठी मी त्याला लाईव्ह असल्याचं सांगून पाहिलं. मी एकटी होते आणि त्याच्यासोबत त्याचा ग्रुप होता. त्यामुळे मला भीती वाटली. त्यानं माझा हात जबरदस्तीनं धरला आणि मला त्याच्या बाईकजवळ नेण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्या बाईकवर बस. आपण राईडला जाऊ, असं तो म्हणू लागला. मला अनर्थ टाळायचा होता. त्यामुळे मी कशीबशी स्वत:ची सुटका केली आणि हॉटेलच्या दिशेनं निघाले. मात्र त्यानं मित्रासह बाईकवरून माझा पाठलाग सुरू केला. तो माझा नंबर मागू लागला. मी प्रचंड घाबरले होते, असं पार्कनं सांगितलं.
जबरदस्तीनं हात धरला, किस करण्याचा प्रयत्न; मुंबईत भररस्त्यात कोरियन यूट्यूबरचा विनयभंग
‘मी खूप घाबरले, दिवसभर रडले’
मी लाईव्ह करत होते. त्या दिवशी संध्याकाळीच मला भेटलेला अथर्व तिख्खा लाईव्ह पाहत होता. तो त्यावेळी जवळच होता. त्यानं तातडीनं माझ्या मदतीसाठी धाव घेतली. तो घटनास्थळी पोहोचला. त्यानं त्या मुलांना हिंदीत काहीतरी समज दिली. मग ते निघून गेले. त्यानंतर मी हॉटेलमध्ये पोहोचले. मी दुसऱ्या दिवशी हॉटेलबाहेर पाऊल टाकलं नाही. मी खूप रडले. मी परदेशी असल्यानं तक्रार कुठे आणि कशी करायची याची मला कल्पना नव्हती. त्यावेळी माझ्या आणखी एका प्रेक्षकानं (आदित्य दुबे) मला मदत केली. आदित्य स्वत: एक स्ट्रिमर आहे. त्यानं माझा व्हिडीओ रिपोस्ट केला. तो दोन तासांत व्हायरल झाला. २ डिसेंबरला आदित्य माझ्यासोबत पोलीस ठाण्यात आला. जबाब देण्यात आणि पुरावे जमा करण्यात त्यानं मला मोलाची मदत केल्याचं सांगत पार्कनं कृतज्ञता व्यक्त केली.

भारतात खूप प्रेम मिळालं, पण मायदेशात…
विशेष म्हणजे तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला भारतातून खूप प्रेम मिळालं. पण माझ्या मायदेशातून (दक्षिण कोरियातून) आलेल्या प्रतिक्रिया अगदी उलट होत्या. त्यांनी यासाठी मलाच दोष दिला. माझ्यासोबत घडलेल्या घटनेचा वापर मी कंटेटसाठी केल्याचं अनेकांना वाटलं. या प्रकारात मीच पीडित होते. मात्र त्यासाठी मलाच जबाबदार धरण्यात आलं, असं पार्कनं सांगितलं.

मी त्यादिवशी जवळपास ८ ते १० तास लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. मात्र दुर्दैवानं त्यातील केवळ १० मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या दुर्दैवी प्रकार घडूनही मला या देशाबद्दल खूप प्रेम वाटतं. मला मुंबईत अनेक चांगली माणसं भेटली. माझ्यासोबत घडलेल्या त्या प्रकारानंतर कित्येक जण माझ्या मदतीला आले. त्यांनी धीर दिला. पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली. या सगळ्यामुळे मी भारतामधील मुक्काम वाढवण्याचा विचारात असल्याचं पार्क म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here