महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासींना सामाजिक, शैक्षणिक आरक्षणासोबत राजकीय आरक्षण ही संविधानात अंतर्भूत केले. त्यामुळे राजकीय आरक्षण हा दलितांचा घटनात्मक अधिकार आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. दलितांचे राजकीय आरक्षण हिरावून घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.
दलित आदिवासींसाठी असणारे राजकीय आरक्षण कुणाला नको हवे असेल तर त्याने त्याच्या पुरते ते नाकरावे, ज्याला नको असेल त्याने राजकीय आरक्षण घेऊ नये. मात्र दलित आदिवासींसाठींचे राजकीय आरक्षण बंद करण्याची चुकीची मागणी कोणी करू नये, असा टोला आठवले यांनी आंबेडकरांचं नाव न घेता लगावला आहे. राजकीय आरक्षण ह दलितांचा घटनात्मक अधिकार आहे. तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते आंबेडकर?
प्रकाश आंबेडकरांनी गेल्या आठवड्यात भोपाळ दौऱ्यावर असताना राजकीय आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, व्होट बँकेचं राजकारण सत्ता जाण्याच्या भीतीने हे आरक्षण रद्द करण्याची कोणत्याच राजकीय पक्षात धमक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अनुसूचित जाती आणि जमातीला केवळ दहा वर्षांसाठीच आरक्षण देण्यात आलं होतं. तशी संविधानात तरतूद आहे, याकडे पत्रकारांनी आंबेडकरांचं लक्ष वेधलं असता संविधानाबाबतचं तुमचं हे अज्ञान आहे, असं ते म्हणाले. संविधानात दहा वर्षाच्या आरक्षणाची जी तरतूद आहे, ती केवळ राजकीय आरक्षणाबाबतची आहे. इतर आरक्षणाबाबतची नाही, असं ते म्हणाले होते.
लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय प्रतिनिधीत्व मिळावं म्हणून हे आरक्षण ठेवण्यात आलं. मात्र, त्यानंतर १९५४मध्ये स्वत: बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची तरतूद काढून टाकण्याची मागणी केली होती. राजकीय आरक्षणाची गरज नसल्याचं बाबासाहेब म्हणाले होते, असा दावाही आंबेडकर यांनी केला होता. घटनेने सर्वांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे लोकांनी मतदानाचा अधिकार वापरावा. मग तो मतदार संघ आरक्षित असो वा अनारक्षित, असं त्यांनी सांगितलं होतं. राजकीय आरक्षणाचा हेतू सफल झाला आहे. आम्हालाही तेच वाटतंय. अनेक आंबेडकरवादी तेच म्हणत आहेत. पण भाजप असो की काँग्रेस कुणातही राजकीय आरक्षण रद्द करण्याची धमक नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times