व्याजदर वाढवण्यासाठी बँकांवर दबाव
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानंतर आता रेपो दर ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी रेपो दर ०.५० टक्क्याने वाढवून ५.९ टक्के करण्यात आला होता. रेपो दर वाढवण्याचा उद्देश म्हणजे तरलता म्हणजेच बाजारातून रोख प्रवाह कमी करणे. परिणामी आरबीआय बँकांना महागड्या दराने कर्ज देते. नंतर बँका देखील ग्राहकांसाठी सर्व प्रकारची कर्जे महाग करतात.
नवीन दर आजपासून लागू
रेपो दर वाढवण्याच्या निर्णयानंतर लगेचच एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआर वाढवले आहेत. बँका कर्जावर एमसीएलआरच्या आधारे व्याजदर लागू करतात. म्हणजेच जेव्हा एमसीएलआर वाढतो तेव्हा कर्जावरील व्याजदर वाढतो. एचडीएफसीने ७ डिसेंबर २०२२ पासून एमसीएलआरमध्ये ०.१० टक्क्यांची वाढ लागू केली आहे. यामुळे बँकेचे व्याजदर एका रात्रीच्या मुदतीच्या कर्जापासून 3 वर्षांपर्यंतच्या कर्जाच्या कालावधीपर्यंत वाढले आहेत.
जीडीपी वाढीचा दर जैसे थे
आरबीआयचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के असेल. याआधी या आर्थिक वर्षात वाढीचा अंदाज ७ टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ४.४ टक्के असू शकतो. जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ४.२ टक्के असू शकतो, असे आरबीआयने म्हटले.
एमसीएलआरमध्ये मोठी वाढ
मोठ्या खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने कर्जावरील एमसीएलआर ८.३० वर आणला आहे, ज्याचा कालावधी एक रात्र आणि एक महिना आहे. एमसीएलआर आता तीन महिन्यांच्या मुदतीच्या कर्जावर ८.३५ टक्क्यांपर्यंत वाढला आणि ६ महिन्यांच्या कालावधीत ८.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय एका वर्षाच्या कालावधीसाठी एमसीएलआर ८.६० टक्के आणि २ वर्षांच्या कालावधीत ८.७० टक्के झाला आहे. तसेच ३ वर्षांच्या कमाल कर्ज कालावधीवर एमसीएलआर ८.८० टक्क्यांवर पोहोचला आहे.