बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या खिशातील १५ हजार रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आल्याची घटना घडली. तसंच सदर विद्यार्थ्याला दुचाकीवरून उसाच्या शेतात नेत नग्न करून चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर एटीएम सेंटरमध्ये नेत त्याच्या खात्यातून दोन ट्रान्झॅक्शनद्वारे १४ हजार ५०० रुपये काढल्याचा प्रकार बारामतीत घडला. याप्रकरणी तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संबंधित विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर विद्यार्थी हा सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी वसतीगृहात वास्तव्यास आहे. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली.

दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली; अभिनेत्रीवर कोट्यवधींचा गंडा घातल्याचा खळबळजनक आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, सदर विद्यार्थी रविवारी सुभद्रा मॉल येथे खरेदी करून शासकीय महाविद्यालयाकडे निघाला होता. ऑक्सिजन प्लांट्च्या पूर्वेकडील भिंतीजवळ तो आला असता एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या खिशातील १५ हजार रुपये मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतले. त्यावेळी फिर्यादीने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तू माझे पैसे का घेतले अशी विचारणा केली. यावेळी आणखी एका दुचाकीवरून दोघे आले. ते अगोदर तेथे आलेल्या इसमाशी बोलले. तू याला पैसे माघारी दे असं कसं सांगू शकतो म्हणत त्या तिघांनी पीडित विद्यार्थ्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यातील एकाने जबरदस्तीने दुचाकीवर मध्यभागी त्याला बसवले. त्याच्या पाठीमागेही आणखी एक जण बसला.

सीमवादाचे सोलापुरात तीव्र पडसाद; कर्नाटकच्या बस अडवून फासले काळे, वाहक-चालकांचा असा केला सत्कार

आरोपींनी ही दुचाकी गोरड हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूच्या उसाच्या पिकाजवळ नेली. तेथे पैसे परत मागतो काय, असे म्हणत या विद्यार्थ्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. शेतातील उसाने त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पीडित तरुणाचा अंगठा फ्रॅक्चर झाला. तसंच त्याच्या दोन्ही हातावर नखाने ओरखडण्यात आले. तरुणाचे नग्नावस्थेतील फोटोही काढण्यात आले. त्यानंतर तू आम्हाला आणखी पैसे दे, नाहीतर तुझे नग्न फोटो सगळीकडे व्हायरल करू अशी धमकी आरोपींनी दिली.

दरम्यान, दमदाटी करत तरुणाकडून सुरुवातीला १० हजार व त्यानंतर ४ हजार ५०० रुपयांची रक्कम काढून घेतली आणि त्याला तेथेच सोडून आरोपी एमएच-४२, एएल- ६३६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here