पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (एमआयएस) तुम्हाला दरमहा कमाई करण्याची संधी मिळते. नवरा-बायकोने संयुक्त खाते उघडल्यावर ही सुविधा उपलब्ध आहे. योजनेत दुप्पट नफा कसा मिळवायचा, हे खालीलप्रमाणे जाणून घ्या.
वार्षिक कमाई करा
पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेतील संयुक्त खात्याद्वारे, तुमचा नफा दुप्पट होईल. या योजनेद्वारे पती-पत्नीच्या खात्यात वार्षिक एकूण ५९,४०० रुपये तर दर महिन्याला ४,९५० रुपये कमवू शकतात.
मासिक उत्पन्न योजना काय?
एमआयएस योजनेत उघडलेले खाते सिंगल आणि जॉइंट असू शकते. वैयक्तिक खाते उघडताना तुम्ही या योजनेत किमान रु १,००० आणि कमाल रु ४.५ लाख गुंतवू शकता. मात्र, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. अशास्थितीत सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे.
फायदे काय मिळतात
पोस्ट ऑफिसच्या या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे दोन किंवा तीन लोक मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदाला समान रूपात दिले जाते. मात्र गुंतवणूक करण्यासाठी समजून घ्या की संयुक्त खात्याचे कधीही एकल खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. तर एकल खात्याचे देखील संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांना संयुक्त अर्ज देणे आवश्यक आहे.
योजेनेबाबत सविस्तर जाणून घ्या
या योजनेत तुम्हाला सध्या ६.६ टक्के दराने वार्षिक व्याज मिळतो. तर योजनेअंतर्गत, तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजाच्या आधारे परतावा मोजला जातो. म्हणूनच प्रत्येक महिन्यानुसार त्याचे १२ भाग केले जातात. एक भाग तुम्ही तुमच्या खात्यात दर महिन्याला मिळवू शकता. पण जर तुम्हाला त्याची मासिक आधारावर गरज नसेल, तर ही रक्कम मुद्दलात जोडल्यास त्यावर व्याजही मिळते.
उदाहरणासह समजून घ्या
नवरा-बायकोने पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत संयुक्त खात्यात ९ लाख रुपये गुंतवले तर त्याच्या ठेवीवर ६.६ टक्के व्याजदराने वार्षिक परतावा ५९,४०० रुपये असेल. जर ते १२ भागांमध्ये विभागले गेले तर ते दरमहा ४,९५० रुपये होईल. म्हणजे दर महिन्याला तुमच्या खात्यात ४९५० रुपये जमा होतील. त्याच वेळी, तुमची मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील. पोस्ट ऑफिसची ही योजना पाच वर्षांसाठी आहे. त्याच वेळी, तुम्ही ते आणखी पाच वर्षांपर्यंत वाढवू शकता.