यावेळी संजय राऊत यांनी दिल्ली महानगरपालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. काल दिल्लीत आम आदमी पक्षाने आपची १५ वर्षांची सत्ता खेचून आणली. याठिकाणी मतविभागणी झाली नसती तर ‘आप’ला आणखी यश मिळाले असते. पण ‘आप’ कामगिरी कौतुकास्पद आहे. १५ वर्षांची सत्ता खेचून सोपे नाही. तर गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. तिकडे आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर गुजरातमध्येही काँटे की टक्कर पाहायला मिळाली असती. पण कदाचित तुम्ही दिल्ली घ्या आणि आम्ही गुजरात घेतो, असं काहीतरी डिल भाजप आणि ‘आप’मध्ये झाले असावे, अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली.
तर राऊत यांनी हिमालच प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. गुजरात विधानसभेच्या एकूण ६८ जागांपैकी प्रत्येकी ३२ जागांवर भाजप आणि काँग्रेस आघाडीवर आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशात त्रिशंकू परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पण हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्षाने चांगली टक्कर दिली, हे चित्र आशादायक आहे. देशातील तीन प्रमुख निवडणुकांमध्ये, गुजरात भाजपला मिळालं, दिल्ली आपला मिळाली आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसने कडवी झुंज दिली, त्यामुळे भाजपला संघर्ष करावा लागला. गुजरातमधील यशासाठी मी भाजपचे अभिनंदन करतो.
देशातील पुढील निवडणुकांच्यादृष्टीने हे चित्र आशादायक आहे. फक्त विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. हेवेदावे दूर ठेवून एकत्र लढले तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा गुजरातच्या निवडणुकांशी संबंध जोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही या निकालांचा संदर्भ भारत जोडो यात्रेशी लावू नका. राहुल गांधी सध्या देशाच्या आणि काँग्रेसच्या राजकारणापासून दूर आहेत, ते एका वेगळ्या मिशनवर आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
गुजरातमध्ये शत प्रतिशत भाजप
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपने एक्झिट पोल्सच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. सध्या भाजपने १५० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहेत. याचा मोठा फटका काँग्रेसला पक्षाला बसला आहे. एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसल पक्षाला ४०च्या आसपास जागा मिळतील, असे सांगितले जात होते. परंतु, आता काँग्रेस पक्ष २० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. यापूर्वी भाजपने गुजरात विधानसभेत सर्वाधिक १२७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा भाजपकडून हा विक्रम मोडीत काढला जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला जाण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असल्याचे दिसत आहे.