दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षानं १३४ जागा जिंकत नेत्रदीपक यश मिळवलं. त्यामुळे १५ वर्षांनंतर पालिकेतील भाजपची सत्ता गेली. या निवडणुकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता चर्चेत आहे. चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये कोल्हापुरात केलेली कामगिरी गुप्ता यांनी केली आहे.

पश्चिम पटेल नगरात आपच्या कविता चौहान यांनी भाजपच्या मीनू यांना जवळपास ५३०० मतांनी पराभूत केलं. पूर्व पटेल नगरात आपच्या शेली ओब्रान यांनी भाजपच्या दिपाली कपूर यांना २६९ मतांनी मात दिली. रणजीनत नगरमध्ये आपचे अंकुश नारंग यांनी भाजपच्या तेजराम यांचा ६७०० मतांनी पराभव केला. तर बलजीत नगरमध्ये आपच्या रुनाक्षी शर्मा विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या आयुषी तिवारी यांना ३५९१ मतांनी हरवलं.
कोल्हापुरची पुनरावृत्ती दिल्लीच्या पटेल नगरात
महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. भाजपनं सर्वाधिक १०५ जागा जिंकल्या. सलग दोनदा शंभरी ओलांडण्याची किमया भाजपनं साधली. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं. मात्र पाटील यांच्या कोल्हापुरात भाजपला धक्के बसले. जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १० जागा असताना भाजपची पाटी कोरी राहिली. २०१४ मध्ये भाजपनं जिल्ह्यात २ जागांवर विजय मिळवला होता. मात्र या दोन्ही जागा भाजपनं २०१९ मध्ये गमावल्या. कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिकांचा पराभव झाला. तर इचलकरंजीत सुरेश हलवणकर अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.