पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांनी चिठ्ठीवर काय लिहून दिलं होतं?
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि अकाली दल या पक्षांची धूळधाण उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र निवडणूक निकालाआधीच केजरीवाल यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला होता. पंजाब निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अरविंद केजरीवाल यांनी एका चिठ्ठीवर आपली निवडणूक भाकिते वर्तवली होती. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, ‘काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार चरणजीतसिंह चन्नी हे दोन्ही विधानसभा जागांवर पराभूत होणार आहे. तर आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान हे विधानसभा निवडणुकीत कमीत कमी ५१ हजार मतांनी जिंकतील. अकाली दलाच्या बादल कुटुंबातील ५ जण निवडणूक मैदानात आहेत, हे पाचही उमेदवार पराभूत होणार,’ असा अंदाज अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला होता. केजरीवाल यांचे हे सर्व अंदाज बरोबर ठरवत पंजाबमधील जनतेनं ‘आप’ला प्रचंड बहुमताने सत्तेत बसवलं.
दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत मोठी वातावरणनिर्मिती करत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केल्यानंतर एका पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला होता. आम आदमी पक्ष बहुमत मिळवत सत्ता स्थापन करणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याबाबतची आपली भविष्यवाणी त्यांनी एका चिठ्ठीवर लिहूनही दिली होती. मात्र पंजाबमध्ये तीनही अंदाज बरोबर निघालेल्या केजरीवाल यांच्या पदरी गुजरातमध्ये मात्र निराशा आली आहे. या निवडणुकीत ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसूदान गढवी आणि पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.