फतेहपूर मतदारसंघ कांगडा जिल्ह्यात येतो. २०१२ पासून या ठिकाणी काँग्रेस जिंकत आहे. २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसनं बाजी मारली. काँग्रेसनं भवानी सिंह पठानिया यांना उमेदवारी दिली. भवानी सिंह यांनी २०२१ मध्ये झालेली पोटनिवडणूक जिंकली होती. त्याआधी २०१७ मध्ये भवानी सिंह यांचे वडील सुजान सिंह यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली. काँग्रेसनं भवानी सिंह यांना संधी दिली.
भाजपकडून राकेश पठानिया यांना संधी
काँग्रेसनं भवानी सिंह पठानिया यांना रिंगणात उतरवल्यानंतर भाजपनं राकेश पठानिया यांना संधी दिली. जयराम ठाकूर यांच्या सरकारमध्ये राकेश पठानिया कॅबिनेट मंत्री होते. गेल्या निवडणुकीत ते नुरपूरमधून विजयी झाले. यंदाही त्यांना तिथूनच संधी मिळेल असं वाटत होतं. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात प्रचारही सुरू केला. आमदार बदलू नका, सरकार बदलू नका, असं त्यांचं प्रचारवाक्य होतं.
भाजपनं उमेदवारांची यादी जाहीर केली. नुरपूरमधून दुसऱ्याच नेत्याला तिकीट देण्यात आलं आणि राकेश पठानिया यांना फतेहपूरमधून उमेदवारी दिली गेली. त्यामुळे स्थानिकांसाठी राकेश पठानिया बाहेरचे उमेदवार ठरले. राकेश पठानिया यांना २५ हजार ४६२ मतं मिळाली आहेत. तर भवानी सिंह यांनी ३२ हजार ४५२ मतं घेतली आहेत.
पंतप्रधान मोदींनी भाजप नेते कृपाल परमार यांना फोन केला. मोदी परमार यांचा फोन संवाद सोशल मीडियावर बराच गाजला. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. परमार २०१७ मध्ये भाजपचे उमेदवार होते. मात्र त्यांचा पराभव झाला. परमार भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदही होतं. यावेळी तिकीट न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली आणि निवडणूक लढवली. भाजप उमेदवार रिंगणात असताना निवडणूक अर्ज भरल्यानं त्यांना पक्षानं ६ वर्षांसाठी निलंबित केलं.