जळगाव: मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात करोनानं हाहाकार माजला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, या विषाणूच्या भीतीनं अनेक जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं मागील काही घटनांवरून दिसून येतं. जळगावमधील पाचोरा येथील क्वारंटाइन सेंटरमध्येही एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोनच दिवसांपूर्वी हा तरूण क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता.

राज्यात करोना व्हायरसनं () थैमान घातलं आहे. करोनाचा धसका सगळ्यांनीच घेतला आहे. मागील काही दिवसांत काही रुग्णांनी करोना झाल्याच्या भीतीनं आत्महत्याही केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. जळगावच्या पाचोरामध्येही एका ३३ वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पाचोरा येथील क्वारंटाइन सेंटरमध्येच त्यानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. हा तरूण दोनच दिवसांपूर्वी या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. या तरुणाचे स्वॅब नमुने चाचणीसाठी काल घेण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही, असं समजतं. या घटनेनंतर मध्यरात्री तालुका प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या तरुणानं आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणामुळं केली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील तरुणाला करोनासदृश्य लक्षणे असल्याने रविवारी (ता. १९) पाचोरा येथील साईमोक्ष क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी (ता. २०) करोना चाचणीसाठी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्याने सोमवारी मध्यरात्रीनंतर क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास क्वारंटाइन सेंटरमधील काही संशयित रुग्ण झोपेतून जागे झाल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. काहींनी हा प्रकार सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, डॉ. अमित साळुंखे यांनी भेट देत घटनेबाबत माहिती जाणून घेतली.

करोनाच्या भीतीने तणावात

तरुणाने आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. करोनाच्या भीतीने तो तणावात असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्याच्या नातेवाईकांनी देखील तसा दुजोरा दिला आहे, असे पोलिसांनी सांगितले. तरुणावर शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here