नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं प्रचंड यश मिळवलं. गेल्या २७ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे. मागील निवडणुकीत भाजपला शंभरीदेखील गाठता आली नव्हती. मात्र यंदा भाजपनं १८२ पैकी १५६ जागा जिंकत गुजरातमधील वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिलं. भाजपच्या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा वाटा आहे. होमपीचवरील विजयाचा मोठा फायदा मोदींना राज्यसभेत होईल.

विधानसभेत देदिप्यमान विजय मिळवणाऱ्या भाजपच्या नावावर आता आणखी एक विक्रम जमा होणार आहे. २०२६ च्या मध्यापर्यंत गुजरातमधील राज्यसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच ११ जागा भाजपकडे असतील. आमदारांच्या संख्येनुसार राज्यसभेत एका राज्याचे प्रतिनिधी निवडून जात असतात. २०१७ मध्ये काँग्रेसनं गुजरातमध्ये जोरदार मुसंडी मारत ७७ जागा जिंकल्या. त्याचा फायदा काँग्रेसला राज्यसभेत झाला. यंदा काँग्रेसला गुजरातमध्ये जोरदार फटका बसला. त्यांना केवळ १७ जागा जिंकता आल्या. याचा फटका आता काँग्रेसला राज्यसभेत बसेल.
बहुमत मिळूनही काँग्रेस चिंतेत; बडा नेता लागला कामाला, दगाफटका टाळण्यासाठी चंदिगढला रवाना
गुजरातमधून एकूण ११ जण राज्यसभेवर जातात. त्यातील ८ जण भाजपचे आहेत, तर ३ जण काँग्रेसचे आहेत. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये भाजपच्या तीन खासदारांचा कार्यकाळ संपेल. मात्र भाजपकडे असलेलं संख्याबळ पाहता त्यांना तिन्ही जागा राखता येतील. एप्रिल २०२४ मध्ये चार सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतील. यातील दोन भाजपचे, तर दोन काँग्रेसचे असतील. भाजपनं नेत्रदीपक यश मिळवत तब्बल १५६ जागा जिंकल्या आहेत. या संख्याबळाच्या जोरावर भाजप चारही जागा खिशात घालेल. तर जून २०२६ मध्ये आणखी १ जागा जिंकेल. त्यामुळे जून २०२६ मध्ये गुजरातमधील राज्यसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच ११ जागा भाजपकडे असतील. मोठ्या राज्यांमध्ये सहसा असं चित्र दिसत नाही. एकाच पक्षाकडे राज्यसभेच्या सगळ्या जागा असं क्वचितच घडतं.

गुजरातमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसनं हिमाचल प्रदेशात सत्ता खेचून आणली आहे. याचा फायदा त्यांना राज्यसभेत होईल. हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर ३ जण निवडून जातात. एप्रिल २०२४ मध्ये काँग्रेसला एक सदस्य राज्यसभेवर पाठवता येईल. यानंतर २ वर्षांनी काँग्रेसला आणखी एकाला राज्यसभेची संधी देता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here