mla nilesh lanke news, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी – health updates of ncp mla nilesh lanke who is on hunger strike for road repair
अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आमदार लंके यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र असं असतानाही अधिकाऱ्यांकडून कुठलीही दखल घेतली जात नसून लोकप्रतिनिधीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, असा प्रश्न लंके यांनी उपस्थित केला आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी लंके यांची तब्येत काहीशी खालावली असून त्यांचं दोन किलो वजन कमी झालं आहे.
दरम्यान, आमदार निलेश लंके यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी नगर तालुक्यातील करंजी, टाकळी ढोकेश्वर, पारनेर चिचोंडी पाटील, आरणगाव या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे. लंके यांच्या मागणीबाबत लवकर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आगामी काळात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
काय आहे निलेश लंके यांची मागणी?
अहमदनगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली आहे. यासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने मागील तीन दिवसांपासून ते उपोषण करत आहेत.