जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
‘भारत पे’ने अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांच्यासह त्यांचे मेव्हणे, सासरे आणि कुटुंबातील अनेक सदस्यांवर ८८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशनीर ग्रोव्हर आणि त्याची पत्नी माधुरी जैन यांनी बनावट बिले, कंपनीच्या सेवांची यादी, बनावट विक्रेते देऊन ८८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा कंपनीचा आरोप आहे. अशनीर आणि त्यांच्या पत्नीने कंपनीच्या निधीचा गैरवापर करून ‘भारतपे’चे नुकसान केले.
‘भारतपे’ने माधुरी जैन यांच्याविरोधात आयपीसी कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोप खरे ठरल्यास त्यांना ७ ते १० वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. अल्वारेझ आणि मार्सल यांनी या घोटाळ्याची चौकशी केली होती. या तपास अहवालाच्या आधारेच दोघांना ‘भारतपे’मधून बाहेर काढण्यात आले होते. तर आता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशनीर आणि पत्नीवर कोणते आरोप
अशनीर ग्रोवर इरोधात कंपनीने १७ प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. कंपनीने ग्रोवरवर फसवणूक, बनावट कागदपत्रे, घोटाळा असे अनेक आरोप केले आहेत. तर ‘भारतपे’ने ग्रोव्हरची पत्नी माधुरी जैन यांनी कंपनीच्या मालमत्तेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सुमारे ३० बनावट विक्रेत्यांची बिले बनवली, ज्यांची किंमत सुमारे ७१.१ कोटी रुपये आहे. त्यानंतर जेव्हा या विक्रेत्यांची चौकशी केली असताना, या नावाचा कोणीही विक्रेता नसल्याचे आढळून आले. या बनावट कंपन्यांमुळे ‘भारतपे’ला जीएसटी विभागाला १.६६ कोटींचा दंड भरावा लागला. माधुरी जैन यांनी तृतीय पक्ष भरतीसाठी ७.६ कोटी रुपयांचे बिल उभे केले, ज्यांची सेवा कधीही घेतली गेली नाही. यामध्ये सहभागी असलेले ८ कंत्राटदार ग्रोव्हर कुटुंबाशी संबंधित आहेत.
बनावट बिलाने कंपनीची फसवणूक
‘भारतपे’ने म्हटले की, ग्रोव्हर कुटुंब दिल्लीच्या साऊथ एक्समध्ये ज्या डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होते, जे कंपनीचे गेस्ट हाऊस होते आणि त्यासाठी कंपनीच्या खात्यातून ५२ लाख रुपयांचे भाडे भरण्यात आले होते. ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीने कंपनीच्या पैशाने मोठ्या प्रमाणात शॉपिंग केली, उपकरणे आणि फर्निचर खरेदी केले.
कंपनीने नूतनीकरणाच्या नावाखाली माधुरी जैन यांनी स्वतःच्या कंपनी मौवे आणि ब्राउनला १.८५ कोटी रुपयांचा फायदा करून दिला. कंपनीच्या पैशावर अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीने अमेरिका, दुबई, थायलंड आणि जगातील अनेक देशांत वर्ल्ड टूर केले. अशनीर आणि माधुरी यांनी कंपनीसाठी नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी काम केले, ज्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले. यापूर्वी अशनीर ग्रोव्हरने ‘भारतपे’च्या बोर्ड सदस्यांवर निशाणा साधला होता. गोवरने ‘भारतपे’च्या खराब आर्थिक कामगिरीबद्दल कंपनीच्या बोर्ड सदस्यांना गोत्यात आणले.