औरंगाबाद :भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे नव्या वक्तव्याने वादात सापडले आहेत. संस्था बळकट करण्यासाठी सीएसआर निधीचा वापर केला पाहिजे, असं आवाहन करताना चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांनी तर शाळा सुरू करताना लोकांकडे भीक मागितली होती, असं म्हटलं. पाटील यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. तसंच औरंगाबाद येथील ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयाला भेट देण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आले असता कार्यालयाबाहेर आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी करत त्यांना विरोध करण्यात आला. या गोंधळानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘झोपलेल्या जागं करता येतं, मात्र झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. मीडियामुळे लोकांना ही क्लिप ऐकायला मिळाली. त्यानंतर लोक म्हणाले यात तर काहीच आक्षेपार्ह नाही. मला याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही फोन आला होता आणि त्यानेही यात नेमकं काय आक्षेपार्ह आहे, असं विचारलं. माझंही तेच सांगणं आहे आणि लोकांचंही समाधान झालेलं आहे. ‘ध’ चा ‘मा’ करणं एवढंच काम विरोधी पक्षांना आता उरलेलं आहे. मी कसा चुकलेलो नाही, याबाबत आता दलित संघटनाच पत्रक काढत आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करणारे विरोधी पक्ष तोंडघशी पडले,’ अस म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली बाजू मांडली आहे.

‘लव्ह जिहाद’चा कायदा करणार का? देवेंद्र फडणवीस थेट बोलले, याबाबत अद्याप आमचा निर्णय…

ज्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला त्याबाबत पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘मी फक्त एवढंच बोललो की शाळा कोणी सुरू केल्या? तर या शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या आणि हे महापुरुष सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी लोकांकडे पैसे मागितले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर लोकांकडे जाऊन धान्य मागितलं. आताच्या काळात या सगळ्याला वर्गणी किंवा सीएसआर म्हणतात. मात्र तेव्हा वेगळी भाषा होती. त्यामुळे सीएसआरच्या माध्यमातून संस्थांना बळकटी द्यावी लागेल, एवढंच माझं म्हणणं होतं,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमात बोलताना नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

औरंगाबादमधील पैठण येथील संतपीठ येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी भाषण केलं. सीएसआरचं महत्व सांगताना पाटील म्हणाले की, ‘सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात शाळा सुरू कुणी केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरू केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली आणि आम्हाला पैसे द्या, असं सांगितलं. आता त्या काळी १० रुपये देणारे होते, सध्या तर १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?’ असं चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here