पुणे : टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला आहे. तळजाई टेकडी परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. या परिसरात फिरायला आलेले नागरिक हा प्रकार पाहून भयभीत झाले होते. साहिल चांगदेव कसबे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.

साहिलचा भाऊ अनिकेत (वय २२) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल त्याच्या मैत्रिणीसोबत टेकडीवर फिरायला गेला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने त्याला हटकले. काही वेळातच या टोळक्याने त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

Video: खंडाळा घाटात थरारक घटना; ब्रेक फेल ट्रक घाटाच्या उतारावरून चालू लागला अन्…

धारदार चाकूने त्याच्या छातीवर आणि डोक्यावर वार करण्यात आले. त्याच्या शरीरावर शस्त्राचे वार झाल्याने साहिल जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या प्रकाराने घाबरलेल्या साहिलच्या मैत्रिणीने साहिलच्या मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी साहिलला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. साहिलवर हल्ला केलेल्या संशयितांची नावे पोलिसांना समजली आहेत. सहकारनगर पोलीस त्यांचा शोध घेत असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश पासलकर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here