Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 10 Dec 2022, 11:52 am
Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचं लोकापर्ण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. पहिला टप्पा ५७० किलोमीटरचा आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिल्या टप्पा आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं या समृद्धी महामार्गाचं नामकरण करण्यात आलं आहे.

७१० किलोमीटरचा महामार्ग

७१० किमीच्या या मार्गावर तब्बल १७०० पूल असून यापैकी ४०० पुलांचं काम सध्या पूर्णावस्थेत आहे. हा संपूर्ण महामार्ग ग्रीनफिल्ड आहे. या मार्गावर जवळपास साडेआठ लाख झाडं लावण्यात येणार आहे. संपूर्ण मार्गावरुन जाताना चहुबाजूने हिरवळ असेल. या मार्गावर वेगमर्यादा ताशी १२० किमीपर्यंत असणार आहे. मुंबई ते नागपूर महामार्गावार ५० हून अधिक ब्रिज असणार आहेत. ५ बोगदे, २४ हून जास्त इंटरचेंजेस असल्याची माहिती आहे.
झिरो कॉरोडॉर असणारा देशातील पहिला महामार्ग

या महामार्गासाठीचा एकूण खर्च ५५ हजार ३३२ कोटी इतका आहे. यासाठी ८३११ हेक्टर भूसंपादन करण्यात आलं आहे. संपूर्ण महामार्ग ‘इंटेलिजन्स ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम’शी अर्थात आयटीएमएसशी जोडलेला आहे. त्यामुळे कोणत्याही चालकाने वेग मर्यादा ओलांडली किंवा लेन तोडणं यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. या मार्गावर झिरो कॉरिडॉर असणारा आहे. अशाप्रकारे कॉरिडॉर असणारा देशातील पहिला महामार्ग ठरणार आहे. यामुळे अपघातांचं प्रमाणही कमी मदत होईल. तसंच वाहतूक सुरक्षितही होईल.
मुंबई – नागपूर अंतर कमी होणार

सध्या मुंबई ते नागपूर प्रवासासाठी जवळपास १४ तासांचा वेळ लागतो. हे अंतर ८१२ किलोमीटर इतकं आहे. पण आता समृद्धी महामार्गामुळे हे अंतर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे मुंबई ते नागपूर हा १४ तासांचा प्रवास जवळपास ८ तासांत पूर्ण करता येईल. या महामार्गामुळे मुंबई – नागपूर अंतर ७०० किलोमीटर इतकं होईल. या मार्गामुळे जलद वाहतुकीला मदत होईल असंही सांगण्यात आलं आहे.
नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा

या मार्गावर नागपूर ते शिर्डी हा पहिल्या टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात १९ टोलबूथ आहेत. तर संपूर्ण नागपूर ते मुंबई या महामार्गावर एकूण २६ टोल बूथ आहेत. टोल बूथवर प्रायोगित तत्वावर महिला कर्मचारी असणार असल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावर टू-व्हिलर, तीनचाकी आणि ट्रॅक्टरला परवानगी नाही. तसंच या मार्गावरुन जाताना जितका प्रवास असेल तितकाच टोल भरावा लागेल.
मुंबई – नागपूर – शिर्डी किती असेल टोल?

नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्पातील ५२० किलोमीटरसाठी ९०० रुपये टोल असल्याची माहिती आहे. तर नागपूर ते मुंबई अशा संपूर्ण ७०१ किमीसाठी १२०० रुपये टोल असू शकतो. फोर व्हिलरसाठी प्रति किमी एक रुपया ७३ पैसे, तर बस किंवा ट्रकसाठी एका किमीसाठी पाच रुपये ८५ पैसे टोल असेल. लहान वाहतुकीच्या वाहनांसाठी दोन रुपये ७९ पैसे, मोठ्या वाहतुकीच्या वाहनांसाठी सहा रुपये ३८ पैसे इतका टोल असेल. जुलै २०२३ पर्यंत महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.