Chandrakant Patil controversy | भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे एका वक्तव्यामुळे वादात सापडले होते. संस्था बळकट करण्यासाठी सीएसआर निधीचा वापर केला पाहिजे, असं आवाहन करताना चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांनी तर शाळा सुरू करताना लोकांकडे भीक मागितली होती, असं म्हटलं. त्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. टीकेची वाढती झोड पाहता चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.
हायलाइट्स:
- भीक शब्दावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी
- महात्मा फुले, आंबेडकरांविषयीच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची दिलगिरी
- पण नव्या वादाला निमंत्रण
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. मी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा उभी केली असे म्हणालो. पण भीक म्हणजे काय, आज आपण गणपती, नवरात्री, आंबेडकर जयंती आणि शिवजयंतीला जाऊन फिरतो, तेव्हा हेच म्हणतो ना, आम्हाला आमची जयंती साजरी करायची आहे, वर्गणी द्या. मी काल बोलताना खांद्यावरचा गमछा काढून भीक मागितल्याची अॅक्शन करून दाखवली. माझ्या भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी इतक्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या मनात श्रद्धा आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे माझ्या रक्तात आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना भीक या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला रोज बातम्या मिळवण्यासाठी राजकीय वाद निर्माण करायचा असतो. पण माझ्या भाषणाचे वारकऱ्यांनी कौतुक केले, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर कालपासून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. परंतु, तेव्हा माझ्या वक्तव्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मागे हटण्यास नकार दिला होता. झोपलेल्या जागं करता येतं, मात्र झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करता येत नाही. मीडियामुळे लोकांना ही क्लिप ऐकायला मिळाली. त्यानंतर लोक म्हणाले यात तर काहीच आक्षेपार्ह नाही. ‘ध’ चा ‘मा’ करणं एवढंच काम विरोधी पक्षांना आता उरलेलं आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र, या वक्तव्यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भीक आणि वर्गणी हे एकसारखेच असल्याचे बोलून नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळणार का, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.