एखाद्याच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होण्याचा धोका नेहमीच असतो. अशा कोणत्याही दुर्दैवी घटनेमुळे कौटुंबिक मालमत्तेचे नुकसान होण्याव्यतिरिक्त इजा किंवा मृत्यू देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत जीवन विमा तुम्हाला अतिशय फायद्याचे ठरते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यासारख्या तेल कंपन्या एलपीजी संबंधित अपघातात बाधित व्यक्तींना त्वरीत मदत देण्यासाठी ‘तेल उद्योगांसाठी सार्वजनिक दायित्व धोरण’ अंतर्गत सर्वसमावेशक विमा पॉलिसी काढतात. यात ओएमसीसह नोंदणीकृत सर्व एलपीजी ग्राहकांचा समावेश आहे.
एलपीजी ग्राहकांना ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. गॅस सिलिंडरमुळे होणार्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित व मालमत्तेच्या हानीसाठी दिले जाते. गॅस कनेक्शनसोबतच ग्राहकांना ४० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. याशिवाय सिलेंडरच्या स्फोटामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. तर ग्राहकाच्या मालमत्तेचे/घराचे नुकसान झाल्यास, प्रति अपघात २ लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा प्राप्त होतो. ज्या व्यक्तीच्या नावावर सिलिंडर आहे, त्यालाच विम्याची रक्कम मिळते. पण लक्षात घ्या की या पॉलिसीमध्ये तुम्ही कोणालाही नॉमिनी बनवू शकत नाही.
सिलिंडर घेताना काळजी घ्या..
या विमा संरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही जेव्हाही सिलिंडर घ्याल तेव्हा तुमच्या सिलेंडरची एक्सपायरी डेट निघून गेलेली नाही याची खात्री करून करा आणि नेहमी एक्स्पायरी डेट पाहूनच सिलेंडर घ्या. कारण ते विमा सिलेंडरच्या एक्सपायरी डेटशी जोडलेले असते. दाव्याचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांचे सिलेंडर पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर ISI मार्कचे आहेत.
दावा कसा करायचा
अपघातानंतर दावा करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट myLPG.in (http://mylpg.in) वर देण्यात आली आहे. ग्राहकाला अपघात झाल्याच्या ३० दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि जवळच्या पोलिसांना अपघाताची तक्रार करावी लागते. ग्राहकाने पोलिस एफआयआरची प्रत घेणे आवश्यक आहे. दाव्यासाठी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या प्रतसोबतच मृत्यू झाल्यास वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. ग्राहकाने थेट विमा कंपनीकडे जाण्याची किंवा दाव्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही. केवळ तेल कंपनीच दावा फाइल करते.