Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 10 Dec 2022, 1:51 pm
BEST Chalo Bus : मुंबईत लोकलनंतर बेस्ट बस मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी आहे. सोमवारपासून मुंबईकरांना बेस्ट बससेवेचं नवं रूप पाहायला मिळणार आहे. या बस सेवा ‘चलो’ बस सेवा म्हणून ओळखल्या जातील. या सर्व बस इलेक्ट्रिक वातानुकूलित असतील. सोमवार ते शनिवार या काळात बेस्टच्या या चलो बस धावतील.

कसा असेल मार्ग?

एक्सप्रेस मार्गावर ठाणे ते बीकेसी दरम्यान सकाळी ७ ते सकाळी साडे आठपर्यंत ३० मिनिटांच्या अंतराने धावतील. त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ते ठाणे दरम्यान संध्याकाळी ५.३० ते ७ पर्यंत सुरू बस सेवा सुरू राहील. ऑल डे रुटसाठी बीकेसी ते वांद्रे स्टेशनदरम्यान सकाळी ८.५० ते संध्याकाळी ५.५० पर्यंत बस सेवा असेल. तसंच वांद्रे स्टेशन ते बीकेसी दरम्यान सकाळी ९.२५ ते संध्याकाळी ६.२५ पर्यंत या प्रीमियम बस चालवल्या जातील.
कशी मिळेल सर्विस?

बेस्टच्या या प्रीमियम सेवा Chalo Mobile App द्वारे उपलब्ध होईल. इथे प्रवाशाला आपली सीट बुक करावी लागेल. या बससाठी ज्या प्रवाशांनी बुकिंग केलं आहे, तेच लोक या बसमधून प्रवास करू शकतील. या बस सर्विसमध्ये अतिशय कमी स्टॉप्स असतील. ‘Chalo’ अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यात एक ‘चलो’ बस सर्विसचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर From to, बसचं शेड्यूल आणि सीटचा पर्याय दिसेल. प्रवासी ऑल डे रुटसाठी ५० रुपये आणि एक्सप्रेस रुटसाठी २०५ रुपयांत सीट बुक करू शकतात. सीट बुक झाल्यानंतर जो बुकिंग आयडी मिळेल, त्याला प्रवासावेळी व्हॅलिडेट करावं लागेल.
‘बेस्ट’ची वेलकम ऑफर

सुरुवातीच्या काळात सेवांसाठी बेस्टकडून प्रवाशांना वेलकम ऑफर दिली जात आहे. ही ऑफर अॅपद्वारे मिळेल. या ऑफरमध्ये ऑल डे रुटच्या पहिल्या पाच सर्विस केवळ १ रुपयांत आणि एक्सप्रेस रुटच्या पाच फेऱ्या केवळ १०० रुपयांत उपलब्ध होतील. या ऑफरशिवाय बेस्टकडून दररोजच्या प्रवाशांना सब्सक्रिप्शन प्लॅनही दिला जात आहे. एक्सप्रेस रुटसाठी एक महिन्यात १० राइडची किंमत २०५० रुपये होते, याला सब्सक्रिप्शन प्लॅनअंतर्गत १४४० रुपयांत घेता येईल.
सेफ्टी फीचर

या ऑफरमध्ये ९० दिवसांची व्हॅलिडिटी प्लॅनही आहे. यात प्रवाशाला ९० राइड मिळतील आणि प्रत्येक राइडसाठी १०३ रुपये खर्च करावे लागतील. ऑल डे राइडसाठीही सब्सक्रिप्शन प्लॅन आहे. वांद्रे ते बीकेसीसाठी एका महिन्यात १० राइडसाठी प्रति राइट ३५ रुपये खर्च करावे लागतील, तर दररोज याचा दर ५० रुपये आहे. या अॅपमध्ये ‘होम सेफ’ नावाचं एक फीचर असेल, जे प्रवाशाच्या सुरक्षिततेशी जोडलं जाईल.
‘चलो’ बसची खास सर्विस

बसमध्ये बसल्यापासून ते गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यापर्यंत प्रवाशाचं लोकेशन कंट्रोल रुममधून ट्रेस केलं जाईल. प्रवासी आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचल्यानंतर कंट्रोल रुममधून फिडबॅक घेतला जाईल. हा फिडबॅक प्रवाशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने घेतला जाईल. खासगी कंपन्यांनी अशी सेवा करोना काळात सुरू केली होती. सर्वसाधारणपणे या सर्विसचा वापर ऑफिसला जाणारे-येणारे कॉर्पोरेट सेक्टरमधील लोक करत होते. त्यावरुन बेस्टने ही सर्विस सुरू केली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.