: मुंबई आणि पुण्यानंतर आता नाशिक शहर करोनाचं नेक्स्ट डेस्टिनेशन होत आहे, अशी भीती व्यक्त करतानाच करोनाविरुद्धची ही लढाई लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केलं.

भारतीय जैन संघटना, शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन नाशिक झिरो’ या उपक्रमाचं पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत करोना विरुद्धची लढाई सुरूच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असं सांगतानाच मुंबई-पुण्यानंतर आता नाशिक करोनच नेक्स्ट डेस्टिनेशन होत असून करोनाला हद्दपार करण्यासाठी आता दृढनिश्चयाने प्रयत्न करावे लागतील, असं ते म्हणाले.

हे काम जबाबदारी आणि कष्टाने करावे लागणार आहे. करोना कोणाची जात बघत नाही. आपण मनुष्य आहोत याचा विचार करून जे मापदंड हा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित करून देण्यात आले आहेत, त्याचे पालन करण्याची गरज आहे. करोनाच्या काळात करोना हाच आपल्या सर्वांचा प्रतिपक्ष असून आपल्या सर्वांना करोनविरुद्ध एकत्र येऊन लढाई जिंकायची आहे. करोनाला घाबरून त्याचा सामना जग करू शकत नाही. ही लढाई एकप्रकारची माणूसकीविरूद्धची लढाई समजूनच प्रत्येकाने त्याचा सामना करावयाचा आहे. सामाज माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहचवून मदत करण्याची गरज असून केवळ शासन आणि महापालिका यात यशस्वी होवू शकत नाही, त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन लोकसहभागातून आपण यावर मात करू शकतो, असंही ते म्हणाले. लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नसून तज्ज्ञांच्या मदतीने आपल्याला यावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी अहोरात्र काम करत आहेत यांच्या श्रमाला आपला सलाम असून हेच सर्व आपल्यासाठी आता देव आहे, असंही ते म्हणाले.

राज्याच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण शोधता आले आहेत. त्यातून रुग्ण जरी वाढत असले तरी त्यासाठी भरीव उपाययोजनाही करण्यात येत आहेत. सामाजिक सहभागातून कोरोनावर मात करण्यासाठी विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून ‘मिशन नाशिक झिरो’ राबविण्यात येत आहे. त्यावर पूर्णपणे नियंत्रण भारतीय जैन संघटना करणार असून फिरते दवाखाने कंटेंटमेंट झोन मध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येऊन अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल त्यातून रुग्ण संख्या अधिक वाढणार आहे. मात्र त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना होत असून नागरिकांनी आरोग्य सेवकांना चांगली वागणूक द्यावी तसेच यासाठी पोलीस यंत्रणेने यावर लक्ष द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलं.

यावेळी महापौर सतिश कुलकर्णी, खासदार डॉ.भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा,नंदू साखला, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, प्रशांत पाटील, किशोर सूर्यवंशी, गिरीश पालवे, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here