तरुणानं स्वत:वर गोळी झाडण्याआधी व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवलं. ‘आई, पुढल्या जन्मातही तुझाच मुलगा होईन. मात्र कोणावरही प्रेम करणार नाही- यश’, असं स्टेटस लिहून तरुणानं स्वत:वर गोळी झाडली. यशनं प्रेम प्रकरणातून स्वत:ला संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्महत्येच्या आधी यशनं सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आत्महत्येच्या ८ तासांपूर्वी यशनं ‘तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुला कोणासोबत पाहू शकत नाही,’ अशी पोस्ट लिहिली होती.
आपण मृत्यूला कवटाळणार असल्याचं यशनं कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगितलं होतं. सोशल मीडियावर त्यानं मित्रांना टॅगही केलं होतं. कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो भिलवाड्यात फिरत होता. अनेकांनी त्याला फोन केले. मात्र यशनं कोणाचाच कॉल घेतला नाही.
यशनं स्टेटसवर अकरावीतील वर्गमित्रांचा फोटो शेअर केला. ‘सगळ्या मित्रांना खूप प्रेम. पुढल्या जन्मीही मला तुमच्यासारखेच मित्र मिळावेत,’ असं यशनं स्टेटसमध्ये लिहिलं होतं. एका स्टेटसमध्ये त्यानं त्याच्या प्रेयसीचं नाव लिहिलं. ‘यशला कधीच विसरू नकोस. तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुला दुसऱ्या कोणासोबत पाहूदेखील शकत नाही. म्हणून हे पाऊल उचलतोय. इश्क भी तू, मेरा प्यार भी तू,’ असं यशनं स्टेटसमध्ये म्हटलं होतं.